अखिल भारतीय व्यापारी संघ म्हणजे सीएआयटीने शुक्रवारी नॅशनल ई कॉमर्स मार्केट प्लेस लवकरच लाँच होत असल्याची घोषणा केली आहे. ‘ भारत मार्केट’ या नावाने ही ई कॉमर्स मार्केट प्लेस लाँच होत असून ती नवीन तंत्रज्ञान पार्टनरसह तयार केली गेली आहे. यामुळे देशभरातील रिटेल व्यापारी, उत्पादक त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोहोचवू शकणार आहेत. त्यात होम डिलीव्हरीची सुविधाही दिली जाणार आहे. देशभरातील सर्व रिटेल व्यापारी यात सामील होऊ शकतील.
देशभरातील व्यापाऱ्यांसाठी सुरु होतेय ‘भारत मार्केट’
सीएआयटीचे सचिव प्रवीण खंडेलवाल या संदर्भात म्हणाले, आमचे लक्ष्य ९५ टक्के व्यापारी या मार्केटशी जोडले जाण्याचे आहे. व्यापारी शेअरहोल्डरही असतील. हे ई मार्केट व्यापाऱ्यांसाठीच आहे. काही ठिकाणी आम्ही प्रायोगिक तत्वावर ते सुरु केले आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रयागराज, गोरखपूर, कानपूर, लखनौ आणि बंगलोर येथील व्यापारी, वितरक आणि ग्राहक यांच्याकडून आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दोन आठवड्यात देशातील ९० शहरात हे ई मार्केट सुरु झाले असून लवकरच देशाच्या अन्य भागात ते सुरु केले जात आहे.
देशातील ज्या ९० शहरात ते सुरु झाले आहेत तेथे करोना स्थितीत कंटेनमेंट झोन मध्येही लोकांना आवश्यक सामान पोहोचविले गेले असून त्याबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आमचे कौतुक केले आहे असेही खंडेलवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या वर्षात १ कोटी व्यापारी या ई मार्केट प्लेसशी जोडण्याचा प्रयत्न असून ते साध्य झाले तर हे जगातील एक नंबरचे आणि युनिक ई मार्केट प्लेस बनेल.