एप्रिल मध्ये स्मार्टफोन विक्रीही ठप्प


फोटो साभार यु ट्यूब
भारतात २५ मार्च पासून लॉक डाऊन झाल्यापासून स्मार्टफोनची एकाही शिपमेंट आलेली नाही आणि भारतातील सर्व कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद असल्याने मार्च अखेरीपासून स्मार्टफोन विक्री ठप्प झाली असल्याचे एका अहवालात नमूद केले गेले आहे. लॉक डाऊन संपल्यावर सुद्धा परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान २ ते ४ आठवडे लागतील असा अंदाजही वर्तविला गेला आहे. भारतात दर महिन्यात सरासरी १ कोटी ते १.२ कोटी स्मार्टफोन विकले जातात. मात्र एप्रिल मध्ये अगदी नगण्य म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच स्मार्टफोन विकले गेले असल्याचे रियलमी चे हेड माधव सेठ यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार मार्च मध्येच जगाच्या विविध भागातून करोना मुळे स्मार्टफोन शिपमेंट मध्ये १९ टक्के घट झाली होती. कौंटर पॉइंट रिसर्च असोसिएशनचे डायरेक्टर तरुण पाठक म्हणाले, लॉकडाऊन मुळे स्मार्टफोन कारखाने, रिटेल शोप्स बंद आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सध्या गरजेच्या वस्तूंचीच डिलीव्हरी केली जात आहे. त्यामुळे एप्रिल मध्ये स्मार्टफोन विक्री झालेली नाही. तसेच एकही शिपमेंट नाही. आता मे महिना सुरु झाला आहे आणि करोना संकट अजून कायम आहे. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन कंपन्यांना अनेक आव्हाने पेलावी लागणार आहेत.

मार्च मध्ये तशी स्मार्टफोनची थोडीफार विक्री झाली आहे पण दर महिन्याची विक्री सरासरी पहिली तर ती नगण्य आहे. सॅमसंग, शाओमी, रीअलमी आणि अन्य स्मार्टफोन उत्पादक कंपन्याची असेम्ब्ली २० मार्च पासून बंद आहे. रिअलमीचा ग्रेटर नोयडा प्लांट २१ मार्च पासून बंद असल्याचेही माधव सेठ यांनी सांगितले.

Leave a Comment