विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे उत्सुक


जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजकारण चांगलेच तापले होते. पण, आता विधान परिषदेची निवडणूक होणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील उडी घेतली असून यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मला रस असल्यामुळे विधानपरिषदेवर मला संधी द्यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. आज दुपारी जळगावात एकनाथ खडसे आले होते. आपल्या निवासस्थानी त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

माझ्या नावाची मागील राज्यसभा निवडणुकीत शिफारस करण्यात आली होती. पण, त्या निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो. परंतु, मी महाराष्ट्राच्या राजकारणात इच्छुक आहे. मी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षाही खडसेंनी बोलून दाखवली. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्यामुळे त्यांना राज्यपाल सदस्य म्हणून कुणाची नेमणूक करायची याचा निर्णय घेण्याचा किंवा नकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल, असेही खडसे म्हणाले. इच्छुकांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहे. पण आता महाविकास आघाडी नऊ जागांसाठी 6 उमेदवार देणार, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदारांच्या संख्याबळावर 4 जागा जिंकेल, असा दावा भाजपचा असल्यामुळे महाविकास आघाडीचे सहा आणि भाजप आणि चार उमेदवार उभे केले तर नऊ जागांसाठी दहा उमेदवार असतील. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणे अवघड आहे.

वास्तविक महाविकास आघाडी संख्याबळानुसार पाच जागा सहज जिंकतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांना फक्त एका जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्या तुलनेने भाजपच्या जवळ असलेल्या संख्याबळानुसार, भाजपचे अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेत चौथा उमेदवार यासाठी अवघ्या चार ते पाच मतांची अधिक गरज लागत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजप 14 उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जर तसे झाले तर मात्र, नऊ जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहा उमेदवार असे चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे.

पण, महाविकास आघाडीमधील काही नेते तसेच भाजपमधील काही नेते एकमेकांशी संपर्क करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नदेखील करतील. असे जर झाले तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल. पण तुर्तास तरी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही एकमेकांवर दबावतंत्राचा वापर करत आहे.

Leave a Comment