अखेर २० दिवसांनंतर झाले किम जोंग उनचे दर्शन


सुनचिओन – मागील काही दिवसांपासून सर्वाच माध्यमांमध्ये उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन याच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. पण आता त्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे, कारण शुक्रवारी किम जोंग सार्वजनिकरित्या सर्वांच्या समोर आला. याबाबतची माहिती उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने देत तो २० दिवसांनंतर सर्वांसमोर आल्याचे सांगितले. यापूर्वी त्याच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.


किम जोंग उन हा सुनचिओन येथे उभारण्यात आलेल्या एका फर्टिलायझर कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होता, अशी माहिती कोरिअन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) दिली आहे. सुनचिओन हे उत्तर कोरियाची राजधानी प्योगयांगच्या नजीक आहे. किम जोंग उन याची बहिण किम यो जोंग ही देखील यादरम्यान उपस्थित होती. दरम्यान, ते कंपनीचे उद्घाटन करत असतानाचे काही फोटोही समोर आले आहेत.

किम जोंग उन याच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. तसेच त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ती अयशस्वी ठरल्याचेही सांगितले जात होते. तसेच त्याचा मृत्यू झाल्याच्याही चर्चांना उधाण आले होते. पण त्याबाबत उत्तर कोरियाने कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाने किम जोंग उन हा जिवंत असल्याचे सांगितले होते. तसंच एका ठिकाणी किम जोंग उन याची ट्रेन थांबली असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. परंतु आता एका कंपनीच्या उद्घाटनादरम्यान तो सार्वजनिकरित्या सर्वांच्या समोर आल्यामुळे आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Comment