केदारनाथ मंदिराचे रावळ सांगताहेत परंपरेविषयी


फोटो साभार भास्कर
उत्तराखंड मधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे आता उघडले गेले आहेत मात्र यात्रेकरूंसाठी अजून मंदिर परिसर बंद आहे. केदारनाथाची पूजा, मंदिर बंद करणे, उघडणे यासाठी काही परंपरा शतकानुशतके पाळल्या जात असून त्याची माहिती गुरुस्थानी असलेल्या भीमाशंकर रावळ यांनी दिली आहे. परंपरेप्रमाणे मंदिर द्वारे उघडताना रावळ यांची उपस्थिती आवश्यक आहे. भीमाशंकर रावळ हे केदारनाथाचे ३२४ वे रावळ असून त्यांचा जन्म दक्षिण भारतात झाला आहे.

भीमाशंकर यांनी महाराष्टाच्या सोलापूर येथील वेदपाठशाळेत वेदाभ्यास केला असून केदारनाथ मंदिर उघडण्याच्या वेळी दरवर्षी ते महाराष्ट्रातून उत्तराखंड राज्यात जातात. यंदाही ते नांदेड येथे होते. मात्र कोविड १९ मुळे देशात लॉकडाऊन असल्याने त्यांना मंदिर उघडण्याच्या वेळी केदारनाथ येथे पोहोचणे अवघड होते. ते सांगतात, मंदिर उघडण्याची तिथी परंपरा मोडली जावी असे वाटत नव्हते त्यामुळे त्यांनी लॉकडाऊन कायदा पाळून एका दिवसात १ हजार किलोमीटर याप्रमाणे दोन दिवस प्रवास करून उखीमठ गाठला आणि १४ दिवस क्वारंटाईन झाले. १९ एप्रिल रोजी ते येथे पोहोचले आणि त्यांनी केदारनाथ मुकुट केदारनाथ समितीच्या हाती सोपविला.

भीमाशंकर २००१ पासून केदारनाथ रावल पदावर आहेत आणि आजपर्यंत एकदाही त्यांनी परंपरा मोडलेली नाही. ते म्हणाले केदारनाथच्या पूजेची जबाबदारी रावळवर नाही मात्र यांच्या देखरेखीखालीच पूजा झाली पाहिजे असा नियम आहे. केदारनाथ मुकुट ही एक परंपरा असून त्यामागे मोठी भावना आहे. केदार मंदिर जेव्हा दर्शनासाठी बंद होते तेव्हा हा मुकुट रावळ यांच्याकडे येतो आणि धार्मिक कार्यात रावळ यांनी हा मुकुट घालायचा असतो. भाविकांनी या मुकुटाचे दर्शन घेतले की त्यांना केदारदर्शनाचे फळ मिळते असा विश्वास आहे. भीमाशंकर क्वारंटाइन पिरियड संपवून आज म्हणजे ३ मे रोजी केदार दर्शन घेणार आहेत.

Leave a Comment