वजन कमी करण्यासाठी…

weight
वजन कमी करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. परंतु त्यातले काही अपवाद वगळता बर्‍याच लोकांना अशा प्रयत्नात यश येत नाही. वजन कमी व्हावे म्हणून ते डाएटिंग करतात. मात्र महिनाभर डाएटिंग केल्यानंतर वजनाच्या काट्यावर उभे राहिले की काटा पहिल्या ठिकाणावर आलेला दिसतो. यावर उपाय काय? काही तज्ञांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. डाएटिंग करणारे लोक काही ठराविक डाएट करतात खरे पण जाता येता काहीतरी खात राहतात. करमणूक म्हणून चार काजू तोंडात टाकतात. काजू खाल्ल्याने वजन वाढते हे त्यांना माहीत असते पण चार काजूने असा काय फरक पडणार आहे असा विचार करून त्यांचा हात नकळतपणे काजूच्या डब्याकडे वळतो आणि एकदा चारच काजू पोटात गेले की नंतरचे चार आणखी कधी पोटात जातात हे कळत नाही.

हा सारा मनावरच्या संयमाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे डॉक्टर मंडळी एक सल्ला देतात. मनाला विरंगुळा म्हणून चारच काय पण दहा काजू खा परंतु दहा काजू खाल्ले की तेवढेच काजू एका परातीत काढून ठेवा. नंतर तासाभराने दोन बिस्किटे तोंडात गेली की ती जाऊ द्या परंतु तशीच चार बिस्किटे परातीत काढून ठेवा. एक पोळी खाल्ली की खाणे झाल्यानंतर खाल्लेल्या पोळीएवढीच पोळी परातीत टाकून द्या. अशा रितीने आपण दिवसभरात जे काही खाल्ले असेल तेवढे खाद्य पदार्थ परातीत जमलेले असतील. दिवसाच्या शेवटी परात समोर ठेवा आणि आपण नकळतपणे आणि कळतपणे किती खाल्लेले आहे, त्यांच्या कॅलरीज किती याचा हिशोब करा. मग लक्षात येईल की आपण कळत-नकळतपणे किती खात असतो.

डॉक्टर मंडळी आणखी एक इलाज सांगतात, तुम्ही जे काही खाल्ले असेल ते लिहून ठेवा. अगदी चॉकलेटचा एखादा तुकडा खाल्ला असला तरी त्याची नोंद ठेवा. म्हणजे आपण खरंच किती खात असतो याची लेखी नोंद होईल. आपल्याला काही खावेसे वाटले तर खाण्याच्या ऐवजी पाणी प्या. हाही एक डॉक्टर इलाज सांगत असतात. प्रोसेस्ड् फूड खावू नका. थंड पेये पिऊ नका. मिठाई टाळा. पिझ्झा, बर्गर वर्ज्य करा. बिस्किटांना फाटा मारा. बेकरी प्रॉडक्ट बंद करा. वजन कमी होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment