बालकांचा आदर्श आहार

baby
मुलांना वाढत्या वयामध्ये काय खायला द्यावे असा प्रश्‍न सार्‍या पालकांना पडलेला असतो आणि या संबंधात त्यांच्यावर एवढ्या परस्पर विरोधी माहितीचा भडीमार होत असतो की त्यातली नेमकी कोणती माहिती ग्राह्य मानावी आणि कोणती मानू नये अशा संभ्रमात ते राहत असतात. परिणामी बाजारातली कृत्रिम खाद्यपेये मुलांना देण्याकडे त्यांचा कल असतो. बाजारातले तयार असलेले कसले तरी डबाबंद अन्न आणून मुलांना देणे हेच आधुनिकतेचे लक्षण आहे असाही त्यांचा भ्रम असतो आणि त्यातूनच या डबाबंद अन्नाचे फॅड वाढते. पैशापरी पैसा खर्च होतो पण मुलांना जे खरोखरच मिळायला पाहिजे ते मिळत नाही.

तेव्हा अशा तयार अन्नाच्या मागे न लागता घरातच उपलब्ध होऊ शकणारे खाद्य पदार्थ मुलांना घरगुती पध्दतीने खायला घालणे जास्त श्रेयस्कर ठरते. म्हणूनच आहारतज्ञ नेहमी काही विशिष्ट खाद्य पदार्थाचा आग्रह धरत असतात. आदिवासी मुलांना कुपोषणाचा सामना करण्यासाठी नेमके काय करावे असा प्रश्‍न पूर्वी निर्माण झाला होता. तेव्हा त्यांच्या खाण्यामध्ये बाजारात मिळणार्‍या भाज्या आणि फळे असावीत असा आग्रह धरला गेला. परंतु बाजारातले फळे आणि भाज्या फारच महाग असतात याची जाणीव झाली. त्यावर एका आहारतज्ञाने शेताच्या बांधांवर उगवणार्‍या अशा काही भाज्यांची उदाहरणे दिली की त्या भाज्या केवळ स्वस्तच असतात असे नाही तर मोफत मिळतात. खाण्याची भाजी म्हणून त्यांच्याकडे लोकांचे लक्ष गेलेले नाही. पण बाजारात मिळणार्‍या कोणत्याही महाग भाजीपेक्षा या मोफतच्या भाज्यांमध्ये जास्त पोषणद्रव्ये असतात.

तीच अवस्था फळांची असते. रानामध्ये, जंगलामध्ये अशी कितीतरी रानफळे आहेत की ज्यांच्यामध्ये सफरचंद, संत्रा, मोसंबी अशा महागड्या फळांपेक्षा जास्त पोषणद्रव्ये असतात. ही फळे आणि ह्या भाज्या व्यावसायिक विचार केला असता दुर्लक्षित असतात. कारण त्यांची चव चांगली नसते. पण कोणत्याही चवदार आणि महागड्या फळे आणि भाज्यांपेक्षा त्यांचे पोषक सामर्थ्य मात्र मोठे असते. आहारतज्ञांनी लहान मुलांच्या बाबतीत अशाच काही अन्न पदार्थांची शिफारस केली आहे. पालकाची भाजी फार महाग नसते परंतु तिच्यामध्ये एवढे पोषणद्रव्ये असतात की तिला सहजासहजी दुर्लक्षित करता येत नाही. रताळे हे तर फक्त उपवासालाच खाल्ले जाते परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पोटॅशियम, फोलेट, अ जीवनसत्त्व यांचा मोठा साठा असतो. अंड्यांची अवस्था अशीच असते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये पालक, रताळे आणि अंडी यांचा भरपूर वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment