ज्वालामुखीच्या राखेत दबले होते हे बौद्ध मंदिर


फोटो साभार नवभारत टाईम्स
जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर इंडोनेशियाच्या जावा बेटावर असून ते बोरोबुदूर नावाने जगप्रसिध्द आहे. ९ व्या शतकात शैलेन्द्र राजवंशाने उंच पहाडावर बांधलेले हे भव्य मंदिर कित्येक वर्षे ज्वालामुखीची राख आणि जंगलाने भरून गेलेले होते. १९७० मध्ये युनेस्कोच्या मदतीने ते रीस्टोर केले गेले आहे. आज बुद्धद तीर्थयात्री आणि साहसी पर्यटक यांच्यामध्ये हे मंदिर अतिशय फेमस पर्यटनस्थळ बनले आहे.


प्राचीन मंदिरांना इंडोनेशिया मध्ये चंडी म्हटले जाते. त्यामुळे या प्राचीन बुद्ध मंदिराचे नावही चंडी बोरोबुदूर असे आहे. या मंदिराचा शोध एका इंग्रज लेफ्टनंट गव्हर्नरला लागला. थोमास स्टॅमफोर्ड असे त्याचे नाव. तो १८१४ मध्ये सेमारंग दौऱ्यावर या भागात फिरत होता तेव्हा त्याला जंगलात एक स्मारक असल्याचे समजले. त्याने शोध घेतला आणि १८३४ मध्ये डच इंजिनिअर कॉर्नेलीयस याला जमिनीतून हे मंदिर उकरून बाहेर काढण्याचे काम सोपविले. हे मंदिर पूर्णपणे बाहेर काढण्यास बरीच वर्षे लागली पण १८४२ मध्ये प्रमुख स्तूप शोधला गेला.


हे मंदिर म्हणजे आर्किटेक्चरचा अतिशय सुंदर नमुना मानले जाते. वरून पाहिले तर एका विशाल तांत्रिक बौद्ध मंडलाचे दर्शन होते. या मंदिराचा पाया वर्गाकार असून मंदिरात एकूण ७२ स्तूप, त्यात प्रत्येकी एक बुद्धा मूर्ती आहे. मंदिर परिसरात एकूण ५०४ बुद्ध मूर्ती आहेत. सर्वात मोठा स्तूप ११५ फुट उंचीचा असून वर्षातून एकदाच मे जून मधील पौर्णिमेला येथे पूजा केली जाते. त्यावेळी राष्ट्रीय सुटी असते.

Leave a Comment