आजारी पिलाला घेऊन मनीमाऊची हॉस्पिटल वारी


फोटो साभार कॅच न्यूज
आजारी पडले की हॉस्पिटल किंवा दवाखान्यात जायचे हे माणसाला कळते. आईची माया तर अशी की बाळाला बरे वाटेनासे झाले की परिस्थिती कशीही असो बाळाला डॉक्टरकडे नेऊन उपचार करेपर्यंत तिच्या जीवाला शांती मिळणार नाही. मग ही आई माणूस असो किंवा अन्य प्राणी. कारण प्राणीमात्रात सुद्धा आईचे पिलावरचे प्रेम तसेच असते. याचा एक सुंदर आणि हृद्य अनुभव तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुल येथील एका हॉस्पिटल मध्ये आला.


मार्व ओझकान नावाच्या ट्विटर युजरनी त्या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून अल्पावधीत हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एक मांजर तिच्या आजारी पिलाला तोंडात पकडून हॉस्पिटल मध्ये आलेली दिसते आहे. ड्युटीवरचे डॉक्टर हे पाहून तिच्या जवळ जमतात, पिलाला तपासतात, मांजरीला दुध आणि थोडे खायला देतात. नंतर पिलाला व्हेटरनरी डॉक्टरला दाखविले जाते. हे डॉक्टर मांजर आणि पिलू यांची तब्येत ठीक असल्याचे सांगतात आणि मांजर चक्क पिलाला परत तोंडात धरून हॉस्पिटल बाहेर जाते.

तुर्कस्तान मध्ये हजारो मांजरे आहेत. येथील लोकांना मांजरे आवडतातही. पण आजारी पिलाला तोंडात धरून हॉस्पिटल मध्ये नेणारी मांजर आगळीच म्हणायला हवी. या व्हिडीओला ८० हजाराहून अधिक लाईक्स, कॉमेंट्स आणि रीट्विट मिळाले आहेत. करोना, लॉकडाऊन, सोशल डीस्टन्सिंग याविषयी सारखे ऐकून कंटाळलेल्या जनतेला या व्हिडीओ मुळे नक्कीच सुखद धक्का मिळाला आहे.

Leave a Comment