ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे काल मुंबईतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. मागील दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी लढत होते.
या बाईकला ऋषी कपूर यांच्यामुळे आले होते सुगीचे दिवस
1970 च्या दशकात ऋषी कपूर यांनी आपले वडील राज कपूर यांच्या प्रोडक्शन अंतर्गत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यासोबतच आणखी एक गोष्ट भारतात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणजे ‘राजदूत जीटीएस-175’ ही दूचाकी.
या दुचाकीचा चित्रपटात वापर केल्यानंतर याच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोबतच या दुचाकीला ‘बॉबी राजदूत’ असे नाव देखील मिळाले.
यानंतर भारतात मोटारबाईक आणि युवकांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. या बाईकच्या भारतीय विक्रीसाठी इस्कॉर्ट्स ग्रुपने एसएचएलसोबत देखील करार केला. याचा चांगला परिणाम देखील पाहण्यास मिळाला. 173सीसी इंजिन, टू-स्ट्रोक इंजिन आणि सिटिंग पोझिशन आरामदायी नसताना देखील राजदूत जीटीएस 175 बॉबी चित्रपटानंतर भारतीय तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. या बाईकला अनेक टोपणनावे मिळाली. यामध्ये ‘मंकी’, ‘बॉबी बाईक’ ही नावे होती.
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज हिरो ग्रुपचे चेअरमन पवन मुंजाल आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी देखील आदरांजली वाहिली.