आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्या स्थानावर गटांगळी


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाल्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने अव्वल स्थान काबिज केले आहे. विराट सेनेवर ही मोठे नामुष्की ओढवली आहे.


आयसीसीच्या क्रमवारीच्या सध्याच्या अद्ययावत माहितीनुसार, मे २०१९ नंतर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची मोजणी १०० टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील कसोटी सामने ५० टक्के आहेत. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघदेखील कसोटी आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने प्रथम स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकदिवसीय क्रमवारीत इंग्लिश क्रिकेट संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे आता ११६ गुण आहेत, न्यूझीलंड ११५ गुणांसह दुसर्‍या आणि टीम इंडिया ११४ गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर आहे.


दरम्यान टीम इंडिया अजूनही आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. ही टीम इंडियासाठी दिलासा देणारी बाब आहे. आयसीसी जागतिक कसोटी चँपियनशिपमध्ये एकूण ९ संघ सहभागी आहेत. यामध्ये सर्व संघ ६ कसोटी मालिका खेळतील आणि त्यानंतर अंतिम कसोटी सामना पॉईंट टेबलच्या आधारे टॉप -२ संघांमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल.

Leave a Comment