जगातल्या पहिल्या घड्याळाची आजची किंमत आहे ३१४ कोटी


फोटो साभार विकीपिडिया
काही दशकांपूर्वी घड्याळ तशी नवलाची वस्तू होती आणि घरात, हातात घड्याळ असणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असे. मग प्राचीन काळी घड्याळ कसे होते, कुणी बनविले होते याची माहिती रंजक असणारच. तर जगातले पहिले घड्याळ जर्मनीतील पिटर हेन्लेन याने ५१५ वर्षापूर्वी बनविले होते. हे घड्याळ पोमेंडर वॉच म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हेन्लेन याला जगातील पहिला घड्याळ निर्माता मानले जाते. त्याच्या या ऐतिहासिक घड्याळाची आजची किंमत ५० ते ८० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ३१४ ते ६११ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे असा दावा केला जातो.


हे घड्याळ हेन्लेनने स्वतःसाठीच बनविले होते. ते त्याने १५०५ साली बनविले होते त्यामुळे हे घड्याळ आज १५०५ वॉच या नावानेही ओळखले जाते. या घड्याळाची कहाणी मोठी मजेदार आहे. हे घड्याळ सफरचंदाच्या आकाराचे आहे. हेन्लेनचे हे घड्याळ जगासमोर आले कसे त्याची कथा औरच म्हणावी लागेल. १९८७ मध्ये घड्याळे बनविण्यात विशेष रस असलेल्या एक युवकाने ते लंडनच्या भंगार बाजारात १० पौंड देऊन खरेदी केले पण त्यावेळी त्याला हे जगातले पहिले घड्याळ आहे याची कल्पना नव्हती. त्याने अनेक वर्षे हे घड्याळ स्वतःकडे ठेवले आणि २००२ साली आणखी कुणालातरी विकले.


घड्याळ खरेदी केलेल्या त्या अज्ञात व्यक्तीने ते आणखी एका तरुणाला विकले. तेव्हा त्या व्यक्तीलाही या घड्याळाचे मोल माहिती नव्हते. घड्याळ खरेदी केलेल्या युवकाने मात्र या घड्याळावर ते बनविले गेल्याचे साल आणि पिटर हेन्लेनची सही पहिली तेव्हा हे घड्याळ अतिशय मौल्यवान आणि प्राचीन असल्याचे त्याच्या लक्षात आले. हे घड्याळ तांबे आणि सोने यांच्या मिश्रणातून बनविले गेले असून जगातील बाजारात त्याची किंमत किमान ३११ कोटी रुपये आहे असे समजते.

Leave a Comment