फोटो साभार भास्कर
अन्य युरोपीय देशांप्रमाणेच आता रशियात सुद्धा कोविड १९ चा प्रकोप झाला असून रशियाचे पंतप्रधान मिशाईल मिशुस्टीन यांची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली आहे. न्यूज एजन्सी एएफपीच्या बातमी नुसार गुरुवार पर्यंत रशियातील १ लाखापेक्षा जास्त नागरिक करोना संक्रमित झाले असून त्यातील १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
रशियन पंतप्रधान मिशुस्टीन करोना पोझिटिव्ह
मिशुस्टीन यांनी याच जानेवारीत पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांची कोविड १९ चाचणी केली त्याचा अहवाल गुरुवारी आला असून तो पोझिटिव्ह आहे. स्वतः मिशुस्टीन यांनी राष्ट्रपती पुतीन यांच्यासह टेलिव्हिजन ब्रॉडकास्टवरील एका व्हिडीओ मधून ही माहिती दिली आहे. मिशुस्टीन यांनी पंतप्रधान पद तात्पुरते सोडून हॉस्पिटल मध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले असून त्यांच्या जागी हंगामी पंतप्रधान म्हणून आंद्रे बेलुसोव्ह याना कार्यभार सोपवावा अशी शिफारस केली आहे. ही शिफारस पुतीन यांनी मान्य केल्याचे समजते.
ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन हेही नुकतेच करोना मुक्त झाले असून पुन्हा ऑफिस मध्ये येऊ लागले आहेत. त्या पाठोपाठ रशियन पंतप्रधान मिशुस्टीन करोनाग्रस्त झाल्याची बातमी आली आहे. जगात आजपर्यंत ३२ लाखाहून अधिक लोकांना करोना संसर्ग झाला असून मृतांची संख्या २ लाख ३० हजारांवर गेली आहे. १ लाख २३ हजारापेक्षा अधिक करोना मुक्त झाले आहेत.