महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापनदिन आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचे मोल राहिलेले नाही कारण हे स्वातंत्र्य मिळावे यासाठी काय काय करावे लागले आहे याची त्यांना माहितीही नाही आणि जाणीवही नाही. म्हणून स्वातंत्र्य दिनाला त्यांनाही जाणीव करून द्यावी लागते. तोच प्रकार महाराष्ट्राच्या बाबतीत झाला आहे. महाराष्ट्राचे तुकडे करून त्यातून विदर्भ वेगळा करावा असा काही लोकांचा तगादा आहे. या लोकांना असे महाराष्ट्राचे तुकडे कसे करावेसे वाटतात याच आश्चर्य वाटते. या लोकांना हे मराठी भाषकांचे एकच राज्य निर्माण व्हावे यासाठी किती मोठा लढा दिला गेला आहे याची जाणीव नाही. त्यामुळेच ते महाराष्ट्राचे दोन भाग करण्याची मागणी करण्यास धजावतात. आमच्या मते महाराष्ट्र एकच राहिला पाहिजे. वेगळा विदर्भ होणे नाही. महाराष्ट्र तुटणे नाही. १९६० साली विदर्भ वर्हाड मध्य प्रांतातून महाराष्ट्रात आला आणि हैदराबाद संस्थानातून मराठवाडा आला. यातून संयुक्त महाराष्ट्र साकार झाला. तेव्हा या दोन मागासलेल्या भागांना महाराष्ट्राच्या नेत्यांनी समान विकासाचे आश्वासन दिले होते.
महाराष्ट्र संयुक्त आणि संपन्न रहावा
या दोन भागात आणि उर्वरित महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत मोठी दरी आहे कारण ते भाग मुळात मागासलेल्या दोन प्रांतातून महाराष्ट्रात आले होते. यातल्या विदर्भात तर खनिज संपत्ती विपुल आहे. या खनिजावर वीज निर्माण केली जाते आणि ती महाराष्ट्राच्या प्रगत भागाला दिली जाते. खनिजे पुरवणारा विदर्भ मात्र उपेक्षित आणि मागासलेलाच राहिला आहे. मराठवाड्याची अवस्था तर त्यापेक्षा वाईट आहे. गेल्या दोन तीन वर्षात विदर्भाच्या बरोबरीने मराठवाड्यातही शेकडो शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्या हे काही मागासलेपणाचे लक्षण नाही. तो अनेक वर्षांच्या उपेक्षेचा आणि दुर्लक्षाचा अटळ परिणाम असतो. विदर्भ आणि मराठवाड्याचे तसेच झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रभावी नेत्यांनी या दोन भागांना सतत उपेक्षेचे धनी केले आहे. सातत्याने ५० वर्षे पेरलेले हे उपेक्षेचे बी आज या आत्महत्यांच्या रूपाने उगवायला लागले आहे. नाही म्हणायला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी याच दोन भागातले नेते जास्त काळ राहिलेले आहेत. वसंतराव नाईक, सुधाकर नाईक, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण आणि आता देवेन्द्र फडणवीस अशी या भागातल्या मुख्यमंत्र्यांची मोठी मांदियाळी आहे.
यातले वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांनी तर जास्तीत जास्त काळ का पदावर राहण्याचे विक्रम केले आहेत. पण मागासलेल्या भागातले मुख्यमंत्री त्या पदावर बसवणे हा त्या भागांच्या विकासाचा निर्णायक घटक नाही. किंबहुना महाराष्ट्राच्या अर्ध्या शतकाच्या इतिहासाने हे सिद्धच केले आहे. कारण मुख्यमंत्री विदर्भाचा पण सूत्रे पश्चिम महाराष्ट्राच्या हातात अशी सत्तेची विभागणी होत आली आहे. मुख्यमंत्री मराठवाड्याचा पण विकासाचे नियोजन मात्र प. महाराष्ट्राला केन्द्रस्थानी ठेवून केलेले असा प्रकार घडत आला आहे. त्यातच महाराष्ट्रातले मुंबई, पुणे, ठाणे, पिंपवड, कोल्हापूर, नाशिक ही प्रगत शहरे आणि औद्योगिक दृष्ट्या पूर्व परंपरेने पुढारलेले भाग मराठवाडा आणि विदर्भापासून दूर आहेत. तिथला प्रगतीचा वारा या भागांना लागतही नाही. जी अवस्था विदर्भ आणि मराठवाडयाची तीच स्थिती कोकणाचीही आहे. हाही भाग मागासलेलाच राहिला आहे. या भागाला मुंबईचा वारा तरी लागतो पण मराठवाडयाला तेही भाग्य नाही. अशी अवस्था असली तरीही विदर्भाचे वेगळे राज्य असावे असे काही म्हणता येत नाही.
सुदैवाने विदर्भातलाच मराठी माणूस या मागणीला अनुकूल नाही. अर्थात त्यामुळे प. महाराष्ट्रातल्या जबाबदार नेत्यांची जबाबदारी अधिक व वाढते. आज विदर्भात आणि मराठवाड्यातले शेती व्यवसाय आणि शेती जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. १९७३ साली मराठवाड्यात अशीच कोंडी झाल्यागत अवस्था निर्माण झाली होती. या अवस्थेतून मराठवाडा विकास आंदोलन निर्माण झाले होते आणि ते नंतर बरेच दिवस चालले होते. कारण त्या काळातला मराठवाड्यातला तरुण सैरभैर आणि अस्वस्थ झाला होता. या तरुणांनीच या आंदोलनाला गतीही दिली होती आणि बळही दिले होते परिणामी त्या वर्षी महाविद्यालयांच्या परीक्षाही झाल्या नाहीत आणि शैक्षणिक वर्ष वाया गेले. याच काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली बिहारात समग्र क्रांती आंदोलन झाले होते. मराठवाड्यातल्या आंदोलनाला त्या आंदोलनाशी जोडण्याचे प्रयत्न झाले पण ते फसले. मराठवाड्याचा मागासलेपणा आणि दैन्य काही दूर झाले नाही. त्याही काळात महाराष्ट्रातून फुटून निघण्याचे काही पिचके आवाज निघाले होते पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. हे दोन भाग महाराष्ट्रात असून उपेक्षित असले तरीही आपला विकास महाराष्ट्रात राहूनच होणार आहे ही समजही तेवढीच तीव्र आहे. तेव्हा महाराष्टातल्या उपेक्षित भागाचा समान विकास व्हावा आणि सारा महाराष्ट्रच विकासाच्या बाबतीत अग्रेसर रहावा अशी शुभेच्छा या निमित्ताने महाराष्ट्रातल्या समस्त जनतेला द्यावीशी वाटते.