मराठी पाऊल…


संयुक्त महाराष्ट्राच्या वाटचालीला आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राने देशातले सर्वात श्रीमंत राज्य हा मान मिळवण्यात यश प्राप्त केले नसले तरी सर्वात पुरोगामी राज्य आणि तुलनेने कायदा सुव्यवस्था उत्तम असलेले राज्य अशी ख्याती मात्र निश्‍चितपणे मिळवलेली आहे. महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्राने मिळवलेले मान आणि वाटचालीतल्या त्रुटी यांचा आढावा निश्‍चितच उचित ठरणार आहे. कोणत्याही राज्याची भरभराट ही त्याला लाभलेल्या नैसर्गिक वरदानावर अवलंबून असते. पंजाबला तसे वरदान लाभलेले आहे. मुबलक आणि उथळ पाण्याची उपलब्धता हा पंजाबसाठी जमेचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे पंजाब हे देशातले सर्वात श्रीमंत राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्राला मात्र निसर्गाची सतत अवकृपा सहन करावी लागते. कारण महाराष्ट्राची भौगोलिक रचनाच अशी आहे की जिच्यामुळे निसर्गाच्या संपन्नतेपेक्षाही दुष्काळाचा सतत वरदहस्त महाराष्ट्रावर असतो.

महाराष्ट्राला नद्या आहेत परंतु त्या फार लहान आहेत आणि त्यांचे लाभ कितीही करून घ्यायचे ठरवले तरीही महाराष्ट्रातली फार तर १५ टक्के जमीन बागायती होऊ शकते. सध्या जलसिंचनाच्या आधुनिक सोयी उपलब्ध झाल्या असल्यामुळे हे प्रमाण कमाल २५ टक्क्यांपर्यंत नेता येऊ शकते. परंतु सहज शक्य असलेली १५ टक्के बागायती जमिनीची मर्यादा आपण अजून गाठलेली नाही. मग २५ टक्क्यांची तर गोष्टच सोडा. परिणामी, महाराष्ट्रातली ८५ टक्के जमीन ही कायम निसर्गाच्या कृपेवर आणि अवकृपेवर अवलंबून राहते. परिणामी महाराष्ट्रातल्या शेतीची उत्पादकता हीसुध्दा कमी आहे. मुळात शेतातच पोटाएवढे पिकत नाही. मग वरकड उत्पन्नाची तर काही सोयच नाही. वरकड उत्पन्न नसल्यामुळे मराठी माणूस शेतीतल्या उत्पन्नातून उद्योगात गुंतवणूक करू शकत नाही. त्यामुळे मराठी माणूस व्यापारी वृत्तीचा नाही. जेमतेम मध्यमवर्गीय जगणे हीच त्याची महत्त्वाकांक्षा असते. निसर्गाच्या अशा अवकृपेमुळे मराठी माणूस गरीब असला तरी तो बुध्दीने मात्र सर्वात अव्वल आहे. मराठी माणसाचा सखोल अभ्यास करणार्‍या अनेक इतिहासकारांनी अशी प्रशस्ती केलेली आहे की, सार्‍या जगावर राज्य करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्याच लोकांमध्ये मराठी माणसांचा अंतर्भाव होतो. म्हणजे जगावर राज्य करण्याची धमक मराठी मनगटात आहे. मात्र काही त्रुटी आहेत.

संघटनेने काम करण्याची प्रवृत्ती नसणे, नव्या तंत्रज्ञानाशी वेगाने जमवून घेण्याची क्षमता नसणे आणि परस्परांचे पाय ओढणे या गोष्टी वगळल्या तर मराठी माणूस ब्रिटिशांपेक्षा भारी आहे. म्हणून ब्रिटिशांनी इतर कोणाही पेक्षा मराठ्यांचा अभ्यास जास्त केलेला आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी दिल्लीचे तख्त राखले. आज केंद्राच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक कार्यक्षम आणि अधिक संख्येने मंत्री कोणाचे असतील तर ते महाराष्ट्राचे आहेत. ही अभिमानाची बाब असली तरी स्वातंत्र्यापासून एकही मराठी माणूस पंतप्रधान झालेला नाही ही खंत नक्कीच मनाला बोचत राहते. मराठी माणूस पंतप्रधान झाला नसला तरी भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. नागरीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्राची ४० टक्के जनता शहरात राहते आणि ६० टक्के जनता खेड्यात राहते. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे २६ महानगरपालिका आहेत. मात्र या महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये उद्योगांना म्हणावी तशी चालना मिळत नसल्यामुळे औद्योगीकरणाच्या क्षेत्रात पंजाब, उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्र ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. तेव्हा महाराष्ट्राला आगेकूच करायची असेल तर नव्या उद्योगांच्या उभारणीतील अडथळे दूर केले गेले पाहिजेत.

महाराष्ट्राची मराठी भाषा, संस्कृती, कला या सगळ्या गोष्टी मराठी माणसासाठी अभिमानाच्या आहेत. कारण मराठी संस्कृती आणि कला या अन्य प्रादेशिक संस्कृती आणि कलांपेक्षा अनेक पदरी वेगळेपणा बाळगून आणि टिकवून आहेत. असा अभिमान असला तरी मराठी संस्कृतीच्या विकासासाठी सरकारच्या पातळीवर आणि समाजाच्या पातळीवरही म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. भारताचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून ती हातात खडग् घेतलेली रणरागिणी आहे असे गृहित धरले तर महाराष्ट्र म्हणजे तिचा हातात खडग् घेतलेला हात ठरतो. म्हणूनच महाराष्ट्राला भारताचा खडग् हस्त असे म्हणतात. असे असले तरी संरक्षण दलात महाराष्ट्राच्या तरुणांची संख्या कमीच आहे. ही उणीवसुध्दा दूर होण्याची गरज आहे. सेनापती बापट यांनी महाराष्ट्रा विषयी जे म्हटले आहे ते आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
मराठी असे आधार या भारताचा
मराठी माती आणि मराठी बाणा हा भारताचा खास ठेवा आहे. तो जतन करण्याची प्रतिज्ञा आपण आज महाराष्ट्र स्थापनेच्या दिनी केली पाहिजे.

Leave a Comment