राजकीय नेत्यांनी ट्विटरद्वारे दिली ऋषी कपूर यांना आदरांजली

अभिनेते इरफान खान यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर याना काल मुंबईच्या सर् एच एन रिलायंस हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते. 2018 मध्ये त्यांना सर्वात प्रथम कॅन्सर असल्याचे समोर आले होते.

बॉलिवूडच्या या लाडक्या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर अनेक क्षेत्रातील मंडळीनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राजकीय नेत्यांनी देखील ऋषी कपूर यांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ऋषी कपूर यांना आदरांजली वाहत ट्विट केले की, ऋषी कपूर यांचे आकस्मिक निधनामुळे धक्का बसला. नेहमी चेहऱ्यावर हस्य असणारे ते सदाबाहर व्यक्तिमत्व होते. ते आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. चिपत्रटसृष्टीची ही मोठी हानी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, प्रेमळ आणि चैतन्यशील असे ऋषी कपूर होते. ते प्रतिभेचे टॅलेंटहाऊस होते. मला अजूनही त्यांच्याशी केलेली चर्चा आठवते. ते चित्रपट आणि भारताच्या प्रगतीबाबत नेहमीच उत्साही होते. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दुखःत मी सहभागी आहे. ओम शांती.

भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहत ट्विट केले की, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावलाय. आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. भारतीय चित्रपट विश्वात त्यांचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील!त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अभिनेते  ऋषी कपूर यांचे निधन चित्रपटसृष्टीसाठी हा खूपच वाईट आठवडा आहे. एत अप्रतिम अभिनेते, सोबतच प्रत्येक वयोगटात असंख्य चाहते असणाऱ्या ऋषी कपूर यांची नेहमी आठवण येईल, असे ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांनी देखील ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत समजल्यावर दुःख झाल्याचे म्हणत, त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

या व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक नेत्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment