यमराजाचा सहकारी चित्रगुप्त याच्याविषयी रोचक माहिती


फोटो साभार पत्रिका
कोणताही जिवंत प्राणी मरण पावला की त्याने त्याच्या आयुष्यात केलेल्या बऱ्या वाईट कृत्याचा हिशोब तपासून त्याला स्वर्ग प्राप्त होणार का नरकात सडावे लागणार याचा निर्णय घेतला जातो अशी हिंदू धर्मियांची समजूत आहे. जिवंत प्राण्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची नोंदणी मृत्युदेव यमराजाचा सहकारी चित्रगुप्त त्याच्या चोपडीत करतो अशीही समजूत आहे. वैशाख शुक्ल सप्तमीला चित्रगुप्त जयंती साजरी केली जाते. आज ३० एप्रिल रोजी चित्रगुप्त जयंती साजरी केली जात आहे.

मृत्युनंतर माणसाचे काय होते याचे रहस्य कायम असले तरी हिंदू धर्मग्रंथात केलेल्या विवेचनानुसार चित्रगुप्त त्याच्या वहीत जिवंत प्राण्याच्या सर्व कर्मांचा हिशोब ठेवतो. त्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही. चित्रगुप्त ब्रह्मदेवाच्या अंश मानला जातो. अशी कथा सांगतात की विष्णुने जेव्हा योग मायेने सृष्टीची कल्पना केली तेव्हा त्याच्या नाभीतून आलेल्या कमळावर प्रजापिता ब्रह्माची उत्पती झाली. ब्रह्माने ब्रह्मांड निर्मिती केली त्यात देव होते, तसेच असुर होते, स्त्री पुरुष होते, तसेच जीवजंतू होते. प्राणी मात्र होते तसा यमराजही होता. त्याला धर्मराज असे म्हटले जाते. म्हणजे धर्मानुसार शिक्षा देणारा.

यमराजाचे हे काम फार मोठे होते त्यामुळे त्याने त्याला एक सहकारी हवा अशी विनंती केली. तेव्हा ब्रह्माने १ हजार वर्षे तप केले आणि त्यातून ब्रह्माच्या कायेपासून एक पुरुष निर्माण झाला तो चित्रगुप्त. चित्रगुप्त कायेपासून निर्माण झाला म्हणून त्याला कायस्थ म्हणतात. चित्रगुप्त यांच्या हातात लेखणी, कर्माचे पुस्तक, दौत आहे आणि तो कुशल लेखक समजला जातो.

Leave a Comment