जगन्नाथ रथयात्रेला करोना घालणार खीळ?


फोटो साभार भास्कर
२८० वर्षे सातत्याने साजऱ्या होत असलेल्या जगन्नाथ यात्रेला यंदा करोनामुळे खीळ बसणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेची तयारी सुरु केली गेली आहे मात्र लॉक डाऊन कायम राहिला तर यात्रा काढायची का किंवा काढायची असले तर भाविकांच्या उपस्थिती विनाच काढायची काय यावर चर्चा सुरु आहे. अर्थात ३ मे रोजी लॉक डाऊन संपत आहे त्यानंतर काय परिस्थिती आहे हे पाहून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

यंदा २३ जून रोजी रथयात्रा आहे. त्याची तयारी अक्षयतृतीयेपासून जगन्नाथ मंदिरात सुरु झाली आहे. मंदिरात चंदन परंपरेनंतर रथ निर्मितीचे काम सुरु केले गेले आहे. मात्र लॉक डाऊनमुळे गेला महिना मंदिर भाविकांसाठी बंद आहे. ठराविक पंडित रोजची पूजा करत आहेत. अश्या परिस्थितीत लॉक डाऊनचा कालावधी वाढला तर रथयात्रा निघणार नाही असे सांगितले जात आहे. आणि काढली गेलीच जगन्नाथ पुरीच्या सीमा सील केल्या जातील, भाविकांना त्यात सहभागी होता येणार नाही मात्र त्याचे लाईव प्रक्षेपण केले जाईल असेही सांगितले जात आहे.

मंदिरातील पंडित पुजारी यांनी रथयात्रा रद्द करण्यास विरोध केलेला नाही. त्याच्या मते भगवानाला त्याचे भक्त सुरक्षित राहावेत अशीच इच्छा असणार. मंदिरात असलेल्या रेकॉर्ड नुसार सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी आक्रमण झाल्याने १४४ वर्षे मंदिरातील पूजा, परंपरा खंडीत झाल्या होत्या त्या आदि शंकराचार्यानी १२ व्या शतकात पुन्हा सुरु केल्या आणि मंदिराला नवे स्वरूप दिले. तेव्हापासून रथयात्रा नेमाने काढली जाते. आषाढ शुध्द द्वितीयेला हा सोहळा संपन्न होतो. २ किमी लांबीच्या या रथयात्रेत कृष्ण, सुभद्रा आणि बलराम यांचे रथ गुंदीच्या मंदिरात नेले जातात आणि सात दिवसानंतर पुन्हा मूळ मंदिरात आणले जातात त्याला बहुडा यात्रा असे म्हटले जाते.

Leave a Comment