ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन


बॉलीवूड अभिनेते, कपूर खानदानाचे सुपुत्र, ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले असून त्यांच्या निधनाची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून दिली आहे. तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर याना काल मुंबईच्या सर् एच एन रिलायंस हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते. आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची करोना टेस्ट केली जाणार होती असेही समजते. यावेळी पत्नी नीतू आणि मुलगा रणबीर त्यांच्यासोबत होते. विशेष म्हणजे याच हॉस्पिटल मध्ये बॉलीवूड अभिनेते इरफान खान यांचेही एक दिवसापूर्वी निधन झाले आहे. म्हणजे अल्पकाळात बॉलीवूडने दोन गुणी कलाकार गमावले आहेत.

गेल्या सप्टेंबर मध्ये त्यांना कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत नेले गेले होते आणि तेथे वर्षभर उपचार घेऊन ते भारतात परतले होते. त्यांची तब्येत काही दिवस चांगली होती पण फेब्रुवारीपासून पुन्हा त्यांची तब्येत अधून मधून बिघडू लागली होती. ऋषी कपूर याना गंभीर अवस्थेत काल हॉस्पिटल मध्ये हलविले गेल्याच्या माहितीला त्यांचे बंधू रणधीर यांनी दुजोरा दिला होता. अन्य एका बातमीनुसार गेला आठवडा ऋषी कपूर हॉस्पिटल मध्ये होते मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही.

ऋषी कपूर यांची तब्येत गंभीर असल्याचे समजताच त्यांची कन्या रीधिमा हिने दिल्ली पोलिसांना मुंबईला जाण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज काल केला होता. रीधिमा दिल्ली येथे तिच्या परिवारासह राहते.

Leave a Comment