युट्यूबवर पाहून आदिवासी महिलांनी चक्क महुआपासून बनवले सॅनिटायझर

महुआद्वारे देशी दारू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशमधील अलीराजपूर आणि झाबुआ अंचल येथील आदिवासी नागरिकांनी आता खास गोष्ट बनवली आहे. येथील नागरिकांनी महुआपासून चक्क सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. या सॅनिटायझरच्या 200 मिली बाटलीची किंमत केवळ 70 रुपये आहे. तर बाजारात मिळणाऱ्या एवढ्याच सॅनिटायझरची किंमत 300 रुपये आहे.

अलीराजपूर जिल्ह्यातील अदिवासी महिलांनी युट्यूबवर सॅनिटायझर कसे बनवायचे ते पाहिले. यानंतर महुआद्वारे सॅनिटायझर बनवत त्याची कमी भावात विक्री करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने देखील या सॅनिटायझरला उपयोगी असल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील धामंदा गावातील 10 महिलांनी युट्यूबवरून सॅनिटायझर बनवणे शिकले व महुआद्वारे याची निर्मिती केली. या महिलांनी या सॅनिटायझरची आधी स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांद्वारे चाचणी केली व मान्यता मिळाल्यानंतरच बाजारात याची विक्री सुरू केली.

हे सॅनिटायझर बनविण्यासाठी तुरटी, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने आणि गुलाबाच्या पाण्याचा देखील वापर करण्यात आला आहे. हे सॅनिटायझर आता शाळा, बँक आणि सरकारी कार्यालयांमध्ये देत आहेत.

Leave a Comment