भारताला अमेरिकेने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासारखी वागणूक दिली


हैदराबाद – भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका अहवालाचा दाखला देत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घेतलेली गळाभेट कामी आली नाही, असेच सध्यातरी वाटत आहे. म्हणूनच अमेरिकेतील संस्था युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने (USCIRF) धार्मिक स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासोबत भारताला यादीत ठेवल्याचे ओवेसी म्हणाले आहेत.


भारतावर बंधने घालण्याची शिफारस युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने केल्याचे ओवेसी म्हणाले. नमस्ते ट्रम्प कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आयोजित केल्यानंतरही भारताला युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमच्या अहवालाने पाकिस्तान, उत्तर कोरिया, सीरिया या देशांसोबत उभे केले आहे. त्यांनी याव्यतिरिक्त भारतावर बंधन घालण्याची शिफारसही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची गळाभेट कामी आली नसल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे ओवेसी म्हणाले.

यासंदर्भात युनायटेड स्टेट्स कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रिडमने एक ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने सर्वाधिक धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचे नमूद केले आहे. त्या संस्थेच्या ट्विटचा एक स्क्रिनशॉट ओवेसी यांनी शेअर केला आहे. ओवेसींनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्या भारत सरकारच्या काही संस्था आणि त्यांच्या अधिकारांवर बंदी घालण्यात यावी, तसेच त्यांची संपत्ती सीज करण्यात यावी आणि त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात यावी असे या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment