कौतूकास्पद ! आजारी बाळासाठी रेल्वेने हजारो किमी लांब पोहचवले उंटाचे दूध

मुंबईच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी एका वडिलांच्या मागणीवरून 1500 किमी  लांब 1 लीटर उंटाचे दूध पोहचवले आहे. ग्रामीण भागात आजही उंट आणि बकरीच्या दुधाचा उपचारासाठी वापर केला जातो. तेलंगानाच्या सिंकदराबाद शहरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 2 वर्षीय आजारी बाळासाठी उंटाचे दूध मिळत नव्हते. अशावेळी रेल्वे अधिकारी मदतीसाठी पुढे आले.

हे कुटुंब बाळ आजारी पडल्यावर राजस्थानवरून उंटाचे दूध मागवत असे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद असल्याने दूध मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाने राजस्थानच्या फालना येथील नोडल अधिकाऱ्याकडे मदत मागितली. नोडल अधिकाऱ्याने ही माहिती सेंट्रल रेल्वेचे मुंबई डिव्हिजनचे चीफ कमर्शल इंस्पेक्टर जितेंद्र मिश्रा यांना दिली.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मिश्रा यांनी दूध पोहचवण्याचा निर्णय घेतला. मिश्रा यांच्यानुसार, फालनावरून थेट सिंकदराबादला थेट पार्सल पोहचवण्याची सेवा नसल्याने कुटुंबापर्यंत दूध पोहचत नव्हते. मिश्रा यांनी कुटुंबाला लुधियाना बांद्रा टर्मिनल पार्सल ट्रेनद्वारे दूध बांद्रापर्यंत पोहचवण्यास सांगितले. जेणेकरून बांद्रावरून दूध दुसऱ्या रेल्वेने सिंकदराबादला पाठवता येईल.

दुधाला लवकरात लवकर पोहचवण्यासाठी मिश्रा यांनी राजस्थान, मुंबई आणि सिंकदराबादच्या रेल्वे अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला. यानंतर दुधाला सीएसएमटी-सिंकदराबाद पार्सल रेल्वेद्वारे कुटुंबापर्यंत पोहचवण्यात आले. माहिती मिळताच 28 तासांच्या आत कुटुंबापर्यंत दूध पोहचवण्यात आले.

Leave a Comment