लासलगाव कांदे बाजाराला बांग्लादेश सीमा खुलण्याची प्रतीक्षा


महाराष्ट्रातील नाशिक जिल्यातील लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांदे बाजारपेठ असून देशात कांद्याची किमती काय ठेवायच्या याचे निर्णय येथून घेतले जातात. यंदा मात्र कोविड १९ संकट आणि त्यामुळे देशभर लागू असलेल्या लॉकडाऊन मुळे या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवतो आहे. या दिवसात वास्तविक येथे दररोज १ हजार पेक्षा जास्त ट्रक कांदा येतो मात्र सध्या ही संख्या खुपच रोडावली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप म्हणाल्या, सरकारने कांदा बाहेर पाठवायला बंदी केलेली नाही. पण लॉकडाऊन मुळे मजूर घरी गेले आहेत, ट्रकचालक नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तोडला तरी येथेपर्यंत आणणे अवघड आहे आणि शेतकरी येत नाहीत यामुळे व्यापारीही नाहीत. येथे या दिवसात प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, प.बंगाल या राज्यातून मजूर येतात पण लॉक डाऊन मुळे ते आलेले नाहीत.

या बाजारपेठेत महिन्याला अंदाजे ७५० कोटीची उलाढाल होते. त्यात सध्या २५ टक्के घट झाली आहे. करोना भीतीमुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांचे स्क्रीनिंग केले जात आहे, चेकअप केला जात आहे आणि बाजारपेठ रोज सॅनीटाईझ केली जात आहे. लॉक डाऊन मुळे शेतकरी, व्यापारी यांचेही नुकसान होते आहे. सरकारने बांग्लादेश सीमा खुली केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे तेव्हा निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

या बाजारपेठेतून गल्फ, इंडोनेशिया, बांग्ला देश अश्या १० देशात कांदा निर्यात होते. या देशांकडून कांद्याला मागणीही आहे. पण लॉक डाऊन मुळे कंटेनर मिळत नाहीत, मजूर नाहीत, प्लास्टिक मटेरिअल नाही. शेतकरी यामुळे १० रु. किलोने कांदा विकत आहे. कांद्याची फार साठवण करता येत नसल्याने तो वेळीच विकणे भाग आहे.

Leave a Comment