केदारनाथ बाबत काही रोचक गोष्टी


फोटो साभार नवभारत टाईम्स
उत्तरांचल चारधाम यात्रेतील महत्वाचे धाम केदारनाथ. आज म्हणजे २९ एप्रिल रोजी हे मंदिर हिवाळयानंतर पुन्हा उघडले जात आहे. वास्तविक अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या मंदिराचे कपाट म्हणजे द्वार उघडले जाते पण यंदा लॉकडाऊन मुळे दोन दिवस उशीर झाला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर अनेक पौराणिक कथा उराशी घेऊन बसलेला आहे. या मंदिराविषयी काही रोचक माहिती खास शिवभक्तांसाठी देत आहोत.

हिवाळा सुरु झाला की मंदिराचे द्वार बंद करण्यापूर्वी या मंदिरात सुद्धा एक नंदादीप ठेवला जातो आणि सहा महिन्यांनी जेव्हा मंदिराचे द्वार पुन्हा उघडते तेव्हाही या दीप तेवत असतो. या दीपाचे पहिल्याच दिवशी दर्शन घेणे अतिशय पुण्यदायी समजले जाते. असा विश्वास आहे की मंदिर बंद असताना येथे देवता गण शिवपूजा करतात त्यामुळे हा नंदादीप तेवता असतो. कैलास नंतर शिवाचे हे दुसरे निवासस्थान मानले जाते. येथे येणाऱ्या कुणालाही मृत्यू आला तर त्याला मोक्ष मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते असाही विश्वास आहे.


केदार १२ ज्योतिर्लिंगांपैकी अर्धे लिंग मानले जाते आणि उरलेले अर्थे लिंग म्हणजे नेपाळ मधील पशुपती नाथ. केदार मध्ये बैलाच्या पाठीचा भाग शिवलिंग स्वरुपात आहे आणि पशुपती मध्ये बैलाचे तोंड आहे. त्यामुळे ही दोन स्थाने मिळून एक ज्योतिर्लिंग मानले जाते. पांडवाना पापमुक्ती मिळण्यासाठी येथे शिवाने बैलाच्या स्वरुपात दर्शन दिले आणि पांडवांचा वंशज राजा जनमेजय याने मंदिराचा पाया घातला असा समज आहे. नंतर आदि शंकराचार्यनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असे मानले जाते.


मंदिराच्या गर्भगृहात पाच पांडव आणि द्रौपदी यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराचे बांधकाम कात्युरी शैलीत केले गेले आहे. केदारचे दर्शन केल्याशिवाय बद्रीची यात्रा पूर्ण होत नाही. या स्थानाला केदार नाव एका राजामुळे मिळाले. या राजाचे नाव केदार होते आणि तो शिवभक्त होता. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शिवाने केदार खंडाचा रक्षक म्हणून राहण्याचे मान्य केले अशी कथा सांगतात. २०१३ मध्ये जेव्हा येथे प्रचंड पूर आला तेव्हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर नष्ट झाला पण मंदिराला कोणतीही हानी पोहोचली नाही. याचे कारण ठरली मंदिराच्या मागे असलेली प्रचंड आकाराची एक शिळा. तेव्हापासून या शिलेचेही पूजन केले जाते.

Leave a Comment