सौदी अरेबियाच्या ‘या’ ऐतिहासिक निर्णयांचे जगभरातून कौतुक


रियाध : अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाने सार्वजनिकपणे चाबकाची शिक्षा देखील रद्द केली आली. आतापर्यंत मानवाधिकारांवरील सौदी अरेबियाची प्रतिमा खराब असून सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान गेल्या काही वर्षांपासून देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी सातत्याने सुधारणावादी पावले उचलत आहेत.

मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अवद अलवाड यांनी सौदी अरेबियाच्या रॉयल डिक्रीचा संदर्भ देताना म्हटले की, केवळ अल्पवयीन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही. फाशीची शिक्षा देण्याऐवजी अल्पवयीन गुन्हेगारांना आता जास्तीत जास्त 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर अलवाड यांनी सौदी अरेबियासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे म्हटले असून आम्हाला आधुनिक कायदा व सुव्यवस्था राबविण्यात हा शाही फर्मान मदत करेल. शिया समाजातील सहा जणांना सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अरब स्प्रिंग चळवळीदरम्यान झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सामील असल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार सदस्यांनी गेल्या वर्षी सौदी अरेबियाला त्यांची फाशी थांबविण्याचे आवाहन केले होते.

वहाबी इस्लामचे सौदी अरेबियामध्ये वर्चस्व आहे. सौदीला आधुनिक राष्ट्रात रूपांतर करण्यासाठी सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगजीच्या हत्येप्रकरणी सौदीची भूमिका प्रश्नचिन्हात पडली आहे आणि क्राउन प्रिन्सही या सुधारवादी चरणांच्या माध्यमातून आपली प्रतिमा बदलण्यासाठी अशीच पावले उचलत आहेत.

सौदी अरेबिया गुन्हेगारांना शिक्षा करण्यात जगात आघाडीवर आहे. या देशात दहशतवाद, बलात्कार, दरोडा, अंमली पदार्थांच्या तस्करीसह सर्व प्रकरणांमध्ये फाशीची तरतूद आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 मध्ये सौदी अरेबियाने 187 लोकांना फाशीची शिक्षा सुनावली. अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारीपासून एकूण 12 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. मानवाधिकार संघटनांनीही सौदी अरेबियामधील खटल्याच्या पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत कारण इस्लामिक कायद्यानुसार येथे राजेशाही शासन आहे.

सौदी अरेबियाने शनिवारी चाबकाने फटके मारण्याची शिक्षा ही रद्द केली आहे. जगभरातील अनेक देशांकडून ही अमानुष शिक्षा संपविण्याची मागणी केली जात होती. सौदी ब्लॉगर रॅफ बादावी यांना सन 2014 मध्ये चाबकाने फटके मारण्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या ब्लॉगरला इस्लामचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आणि त्याला 10 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा आणि 1000 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली.

ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ला एका सौदी अधिकाऱ्याने सांगितले की, सौदीत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी अजूनही हुदुद किंवा कठोर शिक्षा चालूच राहील. हुदुदसाठी हे महत्वाचे आहे की एकतर गुन्हेगार स्वत: गुन्ह्याची कबुली देईल किंवा प्रौढ मुस्लिम त्याबद्दल साक्ष देतील. या प्रकरणात, हुदूद शिक्षा फारच कमी प्रकरणांमध्ये दिली जाते.

Leave a Comment