पालघरप्रमाणे करु नका बुलंदशहरमधील हत्यांचे राजकारण


बुलंदशहर – महाराष्ट्रातील पालघर येथे काही दिवसांपूर्वीच साधूंची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन साधूंची हत्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन साधूचे मृतदेह गावातील मंदिरात आढळून आल्यानंतर ही माहिती समोर आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाच्या चौकशीचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले आहेत.


दरम्यान शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केले आहे. अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघर प्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी अदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मागील १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात वास्तव्यास आहे. मंदिरातील धार्मिक विधी दोन्ही साधू करत असत. दरम्यान, दोघांची सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात हत्या करण्यात आली. गावातील लोक मंगळवारी सकाळी मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली.

घटनेविषयी माहिती देताना बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, दोन साधूंची बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावात हत्या झाल्याची घटना घडली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी व्यसनाधीन असून साधूंचा चिमटा आरोपीने चोरला होता. त्यामुळे आरोपीवर साधू रागावले. त्यातूनच आरोपीने दोन्ही साधूंची सोमवारी रात्री तलवारीने हत्या केली. आरोपीला घटनास्थळावरून तलवार घेऊन जाताना ग्रामस्थानी बघितले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरोधाच कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Leave a Comment