लॉकडाऊन : स्विमिंगसाठी हा पठ्ठ्या भरतो आहे 5 लाख रुपये

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत सर्व सेवा देखील बंद आहेत. सोबत जिम, स्विमिंग पूल, स्पोर्ट हॉल सर्व काही बंद असल्याने लोक घरातच व्यायाम करत आहेत. मात्र सिंगापूरमध्ये एका व्यक्तीने पोहण्यासाठी चक्क 7040 डॉलर्समध्ये (5.37 लाख रुपये) स्विमिंग पूलच भाड्याने घेतला आहे.

सिंगापूरमध्ये एका ब्रिटिश व्यक्तीला लॉकडाऊनमुळे स्विमिंग पूल वापरता येत नव्हता. त्यामुळे त्याने शेजारी व्यक्तीचा स्विमिंग पूल भाड्याने घेण्याचे ठरवले.

रियल इस्टेट एजेंट लेस्टर चेन यांनी सांगितले की, ब्रिटिश व्यक्तीला सेंटोसा कोव्ह येथील 30 मिलियन सिंगापूर डॉलर्सचा पुर्ण बंगलाच भाड्याने घ्यायचा होता. मात्र एका महिन्यासाठी हे भाडे खूपच असल्याने केवळ स्विमिंग पूल भाड्याने घेण्याचे ठरवले.

लेस्टेर यांनी सांगितले की, मी मालकाशी संपर्क साधला व ते दोन अटींवरच बंगला भाड्याने देण्यास तयार झाले. एक म्हणजे केवळ 3 महिन्यांसाठी हा करार असेल व जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला संपुर्ण बंगला हवा असल्यास हा करार रद्द होईल.

व्यक्तीच्या घरापासून हा बंगाल केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. लेस्टेर यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत ऑफिस, फॅक्ट्री, अपार्टमेंट आणि बंगला भाड्याने दिले आहे. मात्र अशाप्रकारे घरातील स्विमिंग पूल देण्याची पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सिंगापूरमध्ये 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

Leave a Comment