अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु


सध्या कॅन्सर या जीवघेण्या रोगाशी अभिनेता इरफान खानची झुंज सुरु असून मागील अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण आज सकाळी अचानक त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर इरफान खानला झाला असून त्यावरच त्याचे उपचार सुरु आहेत. त्याच्या या नियमित उपचारांमध्ये लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे अडथळा तयार होत होता. त्याला त्यामुळेच रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. दरम्यान, इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचे नुकतेच निधन झाले होते. त्याला त्यावेळी लॉकडाऊनमुळे आईच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता आले नसल्याचेही वृत्त होते. त्यावेळी इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईचे अंतिम दर्शन घेतले होते.

इरफानला 2 वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही धक्कादायक बातमी त्याने स्वतः दिली होती. त्याने ट्विट करत म्हटले होते, आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. मागील काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात असेच काहीसे घडत आहे. न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार मला झाला आहे. पण आजुबाजुच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे.

Leave a Comment