आठवे वैकुंठ, बद्रीनाथ


फोटो साभार टूर माय इंडिया
हिमालयातील चार प्रमुख धाम म्हणजे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. पैकी हिवाळयानंतर अक्षयतृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे पुन्हा उघडली गेली तर केदार व बद्रीची मंदिरे उद्या म्हणजे २९ एप्रिल रोजी उघडली जात आहेत. यंदा कोविड १९ मुळे यात्रेकरू यात्रेला जाऊ शकणार नाहीत मात्र परंपरेनुसार या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरे होणार आहेत.

या चारमधील एक धाम बद्रीनाथ याला पृथ्वीवरचे आठवे वैकुंठ म्हटले जाते. हे स्थान भगवान विष्णूचे स्थान आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १२ ते १३ हजार फुट उंचीवर असलेल्या या तीर्थस्थळी जाण्याचा रस्ता अतिशय खडतर आहे. अलकनंदा नदीकाठी, नर आणि नारायण या दोन पहाडांच्या मध्ये हे प्राचीन मंदिर आहे. याला आठवे वैकुंठ म्हणतात कारण येथे भगवान विष्णू सहा महिने योगनिद्रा घेतात असे मानले जाते. उरलेले सहा महिने भाविकांना दर्शन घेता येते.


मंदिराच्या गर्भगृहात बद्रीविशालची मूर्ती असून ती शालीग्राम शिळेतून बनविली गेली आहे. मूर्ती चतुर्भुज आहे आणि ध्यानमुद्रेतील आहे. हिवाळ्यात जेव्हा मंदिर बंद केले जाते तेव्हा मंदिरात एक नंदादीप तेवविला जातो आणि विशेष म्हणजे चार महिन्यानंतर जेव्हा मंदीर उघडले जाते तेव्हाही हा नंदादीप तेवतच असतो. इतक्या उंचीवर प्राणवायू कमी असतानाही हा चमत्कार दर वर्षी पाहायला मिळतो.

या स्थानाचे नाव बद्री पडण्यामागे या परिसरात असलेली जंगली बोरे झाडे कारणीभूत असावीत. पौराणिक कथेनुसार येथे विष्णू ध्यान करत असताना अचानक हिमवृष्टी सुरु झाली. तेव्हा लक्ष्मीने विष्णुना संरक्षण मिळाले म्हणून बोराच्या झाडाचे (बद्री म्हणजे बोर) रूप घेतले आणि त्यांचे बर्फापासून रक्षण केले. विष्णू जेव्हा तपस्येतून उठले तेव्हा लक्ष्मी बर्फात पूर्ण बुडालेली त्यांना दिसली. तेव्हा त्यांनी तिच्या तपस्येवर प्रसन्न होऊन तुही कठोर तप केले आहेस तेव्हा माझ्याबरोबरच तुझीही पूजा केली जाईल असा वर दिला. तेव्हापासून हे स्थान बद्रीनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले.

Leave a Comment