हिमा दास आणि आदिदास


फोटो साभार भास्कर
लॉकडाऊनमुळे सध्या रिकाम्या असलेल्या खेळाडूंनी इन्स्टाग्राम चॅटची सुरवात केली आहे. त्यात सुरेश रैना बरोबरच्या चॅट मध्ये भारताची अॅथलेट हिमा दास हिने तिची आणि आदिदास ब्रांडची सांगितलेली कथा विशेष लोकप्रिय ठरली आहे. यात हिमाने तिच्या करीयरच्या सुरवातीच्या संघर्षाची कथा सांगितली. ती म्हणते, एक काळ असा होता मी अनवाणीच धावत असे. वडिलांनी एकदा स्पर्धेसाठी कॅनव्हास शूज आणून दिले तेव्हा मी त्याच्यावर हाताने आदिदास असे लिहिले होते. आता मात्र ही कंपनी माझ्या नावाचे शूज तयार करते आहे. माझ्या गरजेनुसार बनविलेल्या या बुटांच्या एका बाजूला माझे नाव आहे तर दुसऱ्या बाजूला इतिहास रचा असे लिहिले गेले आहे. हिमा आदिदासची ब्रांड अम्बेसिडरही आहे.

याच मुलाखतीत तिने तिचा रोल मॉडेल सचिन तेंडुलकरच्या भेटीविषयी सांगितले. ती म्हणाली जेव्हा मी सचिनला प्रत्यक्ष पहिले तेव्हा मला रडू आवरेना. आपला रोल मॉडेल आपल्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे यावर प्रथम विश्वास बसला नाही. हा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता.

हिमा आंतरराष्ट्रीय ट्रॅक इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक मिळविलेली पहिली भारतीय खेळाडू आहे. २०१८ मध्ये फिनलंड येथे अंडर २० वर्ल्ड चँपियन शिप मध्ये ४०० मीटर पळणे स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले होते व त्यानंतर विविध स्पर्धात तिने अनेक पदके मिळविली आहेत. तिच्या घराची परिस्थिती अतिशय बिकट असूनही तिने जिद्दीने हे लक्ष्य गाठले आहे.

Leave a Comment