सोनेरी गहू विसरा, येतोय बहुगुणी काळा गहू


फोटो साभार जागरण
एप्रिल मे महिना हा वर्षभराच्या साठवणीच्या गहू खरेदी करण्याचा महिना. आत्ताही देशात गव्हाचे पिक तयार झाले आहे मात्र लॉक डाऊन मुळे बाजार बंद आहेत. गहू खरेदी करताना सोनेरी, वजनदार गव्हाला ग्राहकांची पसंती असते. मात्र पंजाबच्या मोहाली नॅशनल अॅग्रोफूड बायोटेक इन्स्टिट्यूटने (नाबी) विकसित केलेला काळा गहू सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या गव्हाचे पेटंट घेतले गेले आहे.

हा काळा गहू बहुगुणी असून तो कॅन्सर, मधुमेह, स्ट्रेस, हृदयरोग, स्थूलता अश्या अनेक व्याधी मध्ये उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. उत्तराखंड मधील शेतकरी संजय चौधरी यांनी या गव्हाचे पहिले पिक घेतले असून ते यशस्वी ठरले आहे. आता पंजाब, मध्यप्रदेश, हिमाचल, हरियाना मधील अनेक शेतकरी या गव्हाची लागवड करण्यास उत्सुक आहेत. मुख्य म्हणजे या गव्हाचे एकरी उत्पादन नेहमीच्या गव्ह्याच्या तुलनेत अधिक आहे आणि हा गहू महाग असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.

या गव्हाच्या निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या जातीही विकसीत केल्या गेल्या आहेत. याही जाती औषधी आहेत. फळे, भाज्यांना निळा जांभळा रंग येत असतो तो त्यातील अॅथेसाएनिन या द्रव्यामुळे. या काळ्या गव्हात हे द्रव्य अधिक प्रमाणात असून ते अँटीऑक्सिडंट आहे म्हणजेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आहे. इंडोनेशिया, म्यानमार येथे याच प्रकारे काळा तांदूळ पिकविला जातो त्याला चाका टाओ असे नाव आहे. या तांदळात सुद्धा हेच द्रव्य अधिक प्रमाणात असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment