देवदूत ठरलेल्या कॉन्स्टेबलच्या नावावरून महिलेने ठेवले आपल्या बाळाचे नाव

दिल्लीतील एका पोलीस कॉन्स्टेबलने गर्भवती महिलेला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी मदत केल्यानंतर या जोडप्याने आपल्या बाळाचे नाव पोलीस कॉन्स्टेबलच्या नावावरून ‘दयावीर’ ठेवले आहे.

दिल्लीच्या अशोक विहार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले दयावीर यांच्यानुसार, विक्रम यांची पत्नी अनुपाला प्रसुती कळा होत होत्या, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळत नव्हती.

दयावीर यांनी सांगितले की, रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे विक्रम यांनी पोलीस स्टेशनच्या एसएचओला कॉल करत मदत मागितली. त्यानंतर एसएचओने मला या जोडप्याच्या मदतीसाठी पाठवले.

यानंतर दयावीर या जोडप्याच्या घरी गेले व त्यांना कारमध्ये घेऊन हिंदू राव हॉस्पिटलमध्ये पोहचले.

कॉन्स्टेबलने सांगितले की, हे सर्व गुरूवारी सायंकाळी 7 वाजता घडले. 7.30 वाजता मला महिलेने बाळाला जन्म दिल्याची आणि त्यांनी त्याचे नाव दयावीर ठेवल्याची माहिती मिळाली.

उत्तर पश्चिमच्या डेप्युटी पोलीस कमिश्नर विजयंता आर्या म्हणाल्या की, कॉन्स्टेबलने प्रशंसनीय काम केले आहे. दिल्ली पोलीस कोव्हिड-19 च्या लढ्यात आणि लोकांच्या मदतीसाठी सदैव गरज असले तेव्हा मदतीसाठी हजर आहे.

दयावीर हे मागील 10 वर्षांपासून पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून, मागील दीड वर्षांपासून अशोक विहार पोलीस स्टेशनमध्ये नियुक्त आहेत.

Leave a Comment