घरवापसीसाठी या पठ्ठ्याने खरेदी केला चक्क 25 टन कांदा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये परराज्यात कामासाठी गेलेले नागरिक विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिक चालत आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काहीजण याही पेक्षा पुढचे पाऊल उचलत आहेत.

मुळचे उत्तर प्रदेशचे असलेले प्रेम मुर्ती पांडे यांनी घरी जाण्यासाठी जुगाड केला आहे. त्यांनी मुंबईवरून घरी जाण्यासाठी 3 लाख रुपये खर्च करून 25 टन कांदा खरेदी केला व त्यानंतर प्रयागराजला पोहचले. प्रेम मुर्ति पांडे मुंबई विमानतळावर काम करतात.

त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये ते मुंबईतच थांबले. लॉकडाऊन लवकर संपेल असे त्यांना वाटले. पहिला टप्पा सहज गेला. मात्र दुसरा टप्पा अवघड होता. मुंबईत कोरोनाची स्थिती भयंकर असल्याने भिती वाटत होती. प्रयागराज येथील आपल्या पैतृक गावी जाण्यासाठी कोणतेही साधन मिळत नव्हते.

सरकारने फळ, भाजी व अत्यावश्यक सामान नेणाऱ्या ट्रक्सला सुट दिल्याने त्यांनी याच्याद्वारेच घरी जाण्याचा निर्णय घेतला. पांडे यांनी 2.32 लाख रुपयांमध्ये 25,520 किलो कांदा खरेदी केला. यानंतर 77,500 रुपयांमध्ये ट्रक भाड्याने घेत ते 20 एप्रिलला प्रगायराजच्या दिशेने 1200 किमी प्रवासाला निघाले. ते 23 एप्रिलला प्रयागराज येथील मार्केटमध्ये पोहचले.

मार्केटमध्ये कांदा कोणीच खरेदी न केल्याने त्यांनी ट्रक आपल्या गावाला नेला.  पांडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment