परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचा सरकारचा विचार

जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे अनेक नागरिक परदेशात अडकले आहेत. भारतीय नागरिक देखील परदेशात अडकले असून, या नागरिकांना परत आणण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने यासाठी नागरी उड्डान मंत्रालय, एअर इंडिया, राज्य सरकार आणि परदेशातील भारतीय मिशनशी संपर्क करत भारतात परतण्याची इच्छा असणाऱ्यांना आणण्यासाठी योजनेवर काम सुरू केले आहे.

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या यावर विचार सुरू असून, लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतरच त्यांना परत आणले जाईल. नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमान आणि नियमित उड्डाणांचीच मदत घेतली जाईल. मात्र लॉकडाऊनची स्थिती प्रत्येक राज्यात वेगळी असल्याने वेगवेगळ्या पद्धतींची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी नागरिकांना तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.

24 मार्चपासून हजारो भारतीय परदेशात अडकले आहेत. खास करून आखाती देशात अडकलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. जे भारतीय परत येऊ इच्छित आहेत, त्यांची नोंदणी सुरू आहे. अनेक देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल, मात्र तिकिटाचे पैसे त्यांना द्यावे लागतील.

लॉकडाऊनच्या आधी सरकारने परदेशात अडकलेल्या अनेक नागरिकांना भारतात आणले आहे.

Leave a Comment