या देवाच्या दर्शनाला जाताना विमानापेक्षा अधिक पडते बैलगाडीचे भाडे


फोटो साभार खास खबर
बैलगाडीचा प्रवास हा आता बहुतेक शहरी भागात इतिहासात जमा झाला आहे. पण ग्रामीण भागात कुठे कुठे अजूनही बैलगाडीतून माणसे प्रवास करताना दिसतात. बैलगाडी ठरवून ५ किंवा सहा किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी किती खर्च येईल असे कुणाला विचारले तर त्याचे उत्तर ५०, ६० किंवा फारतर १०० रुपये असे दिले जाईल. पण एका ठिकाणी मात्र बैलगाडीतून याच अंतराच्या प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ हजार रुपये म्हणजे मुंबई दिल्ली विमानप्रवासापेक्षा जास्त भाडे आकारले जाते.


मध्यप्रदेशातील रतलामपासून जवळ असलेल्या बिब्रोड या गावात हा चमत्कार घडतो. त्याचे कारण मात्र फारच वेगळे आहे. जैन समाजातील भगवान रिषभदेव यांचे एक मंदिर या गावात आहे. हे स्थान फार प्राचीन म्हणजे तेराव्या शतकातले असल्याचे उल्लेख येतील शिलालेखात आहेत. जैन धर्मियांचे हे महत्वाचे तीर्थस्थान आहे. या मंदिरात जाताना बैलगाडीतून गेले तर जीवनात सुखसमृद्धी नांदते असा विश्वास आहे. मार्गशीर्षात येथे पाच दिवसांची यात्रा भरते त्यावेळी देशभरातून भाविक येथे येतात. बैलगाडीतून मंदिरात जाण्यासाठी अगोदर बुकिंग केले जाते. ५ ते ६ किमीच्या या अंतराला ५ ते ६ हजार रुपये आकारले जातात. २ -३ लोक असतील तर छोटी गाडी २ हजार रुपयात मिळते.

या मंदिरातील भगवान रिषभदेवाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. ७५ सेंटीमीटर उंचीची काळ्या दगडातील ही मूर्ती पद्मासन अवस्थेत आणि अतिशय शांत स्वरुपाची आहे. अशी मूर्ती अन्यत्र कुठेही नाही असे सांगतात. यात्रा काळात शेतकरी आपपल्या बैलगाड्या घेऊन येथे येतात. त्यांच्यासाठी ही वार्षिक कमाईची एक संधी असते. अश्या ५०० ते ५५० बैलगाड्या या यात्रा दिवसात येथे भाविकांची ने आण करतात.

Leave a Comment