ओमानमधून भारतीयांना काढण्याच्या त्या ट्विटवर खऱ्या राजकुमारीने केला खुलासा

ओमानच्या राजकुमारीच्या नावाने असलेल्या एका बनावट ट्विटर अकाउंटवरून तेथे काम करणाऱ्या 10 लाख भारतीय कामगारांना बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती. ओमानच्या राजकुमारी सैय्यदा मोना बिंत फहद अल सैद यांनी मात्र आता स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. आपला या ट्विटशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानच्या एका ट्विटर अकाउंटने आपले नाव बदलून ओमानच्या राजकुमारीच्या नावाने केले होते. त्यानंतर बनावट अकाउंटवरून ट्विट करण्यात आले होते की, भारत सरकारने मुस्लिमांचा छळ थांबवला नाही तर  ओमानमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना बाहेर काढण्यात येईल. हे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड देखील नव्हते.

राजकुमारी सैय्यदा मोना म्हणाल्या की, माझ्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट अकाउंटची चौकशी केल्याने मी सर्वांचे आभार मानते. याच्याशी माझा काहीही संबंध नाही आणि ओमानच्या समाजात अशा गोष्टी अजिबात स्विकार्य नाहीत. सोशल मीडियावर त्या केवळ इंस्टाग्राम अकाउंट @hhmonaalsaid आणि ट्विटरवर @MohaFahad13 अकाउंट वापरतात.

पाकिस्तानचे पत्रकार हामिद मीर यांनी देखील हे बनावट अकाउंटद्वारे करण्यात आलेले ट्विट सत्य मानत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

ओमान राजकुमारीच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय दूतावासने देखील त्यांचे आभार मानले आहेत. ओमानमधील भारतीय राजदूत मुनू महवार म्हणाले की, भारत ओमानसोबत असलेल्या मैत्रीपुर्ण संबंधांचा आदर करतो. दोन्ही देशांचे नाते मजबूत राहण्यासाठी येथे लोक आणि सरकारसोबत नेहमीच काम सुरू राहील.

Leave a Comment