करोना पाठोपाठ जपानला प्रलयंकारी त्सुनामीचा धोका


फोटो साभार पत्रिका
जगातील अन्य देशांप्रमाणेच करोनाशी लढत असलेल्या जपान मध्ये नजीकच्या काळात कधीही प्रलयंकारी भूकंप आणि त्यापाठोपाठ विनाशकारी त्सुनामी येण्याचा धोका असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी जपान सरकारला दिला आहे. पॅसिफिक महासागरात भूगर्भात मोठ्या हालचाली सुरु असून त्यामुळे कोणत्याही क्षणी ९ रिश्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो आणि त्यामुळे ३० मीटर म्हणजे सुमारे ९८ फुट उंचीच्या त्सुनामीच्या भयंकर लाटा मोठे नुकसान करू शकतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात टोक्यो इलेक्ट्रिक पॉवरने जपान सरकारला धोक्याचा इशारा देऊन सावध केले आहे. १८ एप्रिल रोजीही टोक्योला भूकंपाचा धक्का बसला होता मात्र त्यात फारसे नुकसान झाले नव्हते. जपान भूगर्भ आणि हवामान विभागाच्या मते जपानच्या दक्षिणेकडील ओगासवरा बेटाजवळ प्रचंड भूकंप होण्याची शक्यता असून या परिस्थितीवर आत्ता पासूनच योग्य उपाय योजले गेले नाहीत तर लोकांचा जीव वाचविणे अतिशय अवघड होणार आहे.

२०११ साली जपानला ९ रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्या पाठोपाठ त्सुनामीचा दणका बसला, तेव्हा टोक्यो इलेक्ट्रिक पॉवरच्या होल्डिंग इंकची मालकी असलेल्या फुकेशिमा येथील न्युक्लिअर प्लांटचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा याच क्षमतेचा भूकंप आणि त्सुनामी आली तर हा प्रकल्प बुडेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे. २०११च्या भूकंप आणि त्सुमानी मध्ये १०८७२ लोकांचा जीव गेला होता तर १७ हजार बेपत्ता होते. जपान रिंग ऑफ फायरच्या कक्षेत येत असल्याने येथे नेहमीच भूकंप होतात आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात.

Leave a Comment