भारतीय क्रिकेटपटू देशासाठी नव्हेतर केवळ स्वत: साठी खेळतात


भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेले संबंध सगळ्या जगाला माहिती आहेत. क्रिकेटदेखील त्याला अपवाद नाही. आता त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

इंझमाम उल हक पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजाच्या यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना म्हणाला की, पाकिस्तानचे खेळाडू जेव्हा भारताविरुद्ध खेळत होते, भारतीय संघाची फलंदाजी तेव्हा आमच्यापेक्षा मजबूत होती. जरी पाकिस्तानचे फलंदाज ३०, ४० धावा करत असले तरी ते संघासाठी धावा करत होते. पण याच्या विपरित परिस्थिती भारतीय संघाची होती. भारताच्या खेळाडूंनी १०० धावा केल्या तरी त्या स्वत:साठी असायच्या. त्याकाळी फक्त येवढाच काय तो फरक भारत आणि पाकिस्तान संघामध्ये असल्याचे इंझमाम यावेळी म्हणाला.

इंझमामने याव्यतिरिक्त या चर्चेदरम्यान इमरान खानच्या नेतृत्त्वाचीदेखील प्रशंसा केली. यावेळी तो म्हणाला की, अधिक टेक्निकल किंवा रणनीती बनवणारा तो कर्णधार नव्हता. पण तो आपल्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास ठेवत होता. एखाद्या खेळाडूमधून सर्वोत्तम खेळाडू कसा निवडायचा हे त्याला चांगलेच अवगत होते. तो त्याच्या या कौशल्यामुळेच महान कर्णधार बनला होता. कोणत्याही खेळाडूने जर एका मालिकेत चांगली कामगिरी केली नाही, तर त्या खेळाडूला तो संघाबाहेर करत नव्हता. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू त्याची खूप आदर करायचे, असेही इंझमाम यावेळी म्हणाला.

९०च्या दशकात पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध खूप सामने जिंकत होता. तरीही भारतीय संघ यानंतर मजबूत बनत गेला. तसेच पुढे भारताविरुद्ध अनेक सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभूत होऊ लागला. याव्यतिरिक्त भारतीय संघ सध्या जगातील अव्वल क्रमांकाच्या संघांपैकी एक आहे. परंतु दोन देशातील तणावामुळे भारत आणि पाकिस्तान संघात आता फार सामने होत नाहीत.

Leave a Comment