लॉक डाऊन मोडला तर भुताच्या घरात बंद करण्याची शिक्षा


फोटो साभार एनडीटीव्ही
कोविड १९ने जगातील अनेक देशांना जखडून टाकले असून लॉक डाऊन जाहीर करावा लागल्याने नागरिक घरात कोंडले गेले आहेत. लॉक डाऊनचे उल्लंघन बहुतेक सर्व देशात केले जात आहे आणि अनेक देशातून त्यासाठी खास शिक्षा ठरविल्या गेल्या आहेत. कुठे तुरुंगवास, दंड, रस्त्यात उठा बश्या, गळ्यात पोस्टर अडकून फोटो काढणे तर कुठे थेट गोळ्या घालण्यापर्यंत शिक्षेचे अनेक प्रकार वापरले जात आहेत.

इंडोनेशिया मध्ये लॉक डाऊनचे पालन न करणाऱ्यांना एक अजब शिक्षा सुनावली जात आहे. ट्रिब्युन जातेंग न्यूजने दिलेल्या माहितीनुसार परदेशातून आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाइन करणे बंधनकारक आहे मात्र तरीही हे लोक बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना जरब बसावी म्हणून सर्जन रेजेंत कुस्तिणार यांनी तांदळाच्या खाचरातील एक जुने घर निवडले असून हे घर भुताचे आहे अशी त्याची प्रसिद्धी आहे.

हे घर स्वच्छ करून घेण्याचा आदेश दिला गेला असून नियम न पाळणाऱ्यांना या घरात कोंडले जाणार आहे. हे घर इतके मोठे आहे की अनेक गावे त्याचा वापर करू शकणार आहेत. अर्थात येथे कोंडण्यात आलेल्या नियममोड बहाद्दरांना जेवण खाण पुरविले जाणार आहे, त्यांच्यावर देखरेख असेलच. सध्या येथे दोन जणांना ठेवले गेल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment