मास्टरब्लास्टर सचिन साजरा करणार नाही वाढदिवस


फोटो साभार औटलुक इंडिया
टीम इंडियाचा माजी कप्तान आणि मास्टरब्लास्टर सचिन येत्या २४ एप्रिल रोजी ४७ वर्षाचा होतो आहे मात्र यंदा तो त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही असे समजते. देशात आणि जगात पसरलेले करोना संकट, पाहता सचिनने ही वेळ सेलिब्रेशन करण्याची नसल्याचे सांगून वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याच्या जवळच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिनचा वाढदिवस दरवर्षी तो जेथे असेल तेथे मोठ्या धामधुमीने साजरा केला जातो. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. ही आनंद साजरा करण्याची वेळ नाही त्यामुळे यंदा घरी असूनही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सचिनने घेतला आहे. जग आत्ता गंभीर संकटातून जात आहे अश्यावेळी वाढदिवस साजरा करण्याचा प्रश्नच येत नाही असे सचिनचे म्हणणे आहे. त्याचा हा निर्णय करोना वॉरीअर्स ना पर्सनल सन्मान देण्याचा एक प्रयत्न आहे असे त्याचे म्हणणे आहे. सचिनने करोना लढयासाठी पीएम केअर्स फंडाला ५० लाख रुपये दिले आहेत.

अर्थात सचिनच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा मार्ग शोधला असून त्याच्या फॅन क्लबपैकी एक सचिनचे ४० दुर्मिळ फोटो सोशल मिडियावर शेअर करणार आहे तर आणखी एक फॅन क्लब सचिनच्या सामाजिक कार्याचा परिचय सोशल मीडियावर करून देणार आहे.

Leave a Comment