बिरसा झु मध्ये अनुष्का वाघिणीने दिला ३ पिलांना जन्म


फोटो साभार हिंदुस्तान
करोना प्रकोपामुळे नागरिक घरात बंद झाल्याने एरवी गर्दी असणाऱ्या प्राणीसंग्रहालयातील प्राणीही उदास झाल्याच्या बातम्या येत असतानाचा झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा झु मध्ये सध्या आनंदाचा माहोल पसरला आहे. येथील अनुष्का नावाच्या वाघिणीने तीन शावकांना जन्म दिला असून तिन्ही पिले आणि आईची तब्येत उत्तम असल्याचे प्राणीसंग्रहालयाकडून सांगितले गेले आहे.

गेल्या मार्च मध्ये या झु मधील अनुष्का वाघीण एकदम चर्चेत आली होती. प्राणीसंग्रहालयात आलेल्या एका व्यक्तीने तिच्या पिंजऱ्यात उडी घेतली होती आणि चिडलेल्या अनुष्काने या आगंतुक व्यक्तीला ठार केले होते. २०१६ मध्ये अनुष्काला हैद्राबादच्या झु मधून प्राणी आदान प्रदान योजनेखाली बिरसा झु मध्ये आणले गेले होते तेव्हा ती आठ वर्षाची होती. २०१८ मध्येही तिने प्रथमच तीन पिलांना जन्म दिला होता.

प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी सांगतात लॉक डाऊन मुळे येथे आता गर्दी नाही. या प्राण्यांना लोकांची, गर्दीची सवय झाली होती. आता गर्दी नाही त्यामुळे प्राणीही मरगळ्यासारखे झाले आहेत. मात्र करोना मुळे रोज झुचे सॅनीटायझेशन केले जात आहे तसेच प्राण्यांचे पिजरे औषधे घालून स्वच्छ केले जात आहेत. प्राण्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात आहे.

Leave a Comment