फेसबुक फ्रेंड बनून अंबानी पुन्हा झाले आशियातील सर्वात श्रीमंत


फोटो साभार नवभारत टाईम्स
जगभरात क्रूड तेलाच्या किमती किमान पातळीच्या खाली गेल्याने देशातील सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण कंपनीला म्हणजे रिलायंसला प्रचंड नुकसान झाले असले तरी कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि फेसबुक मध्ये नुकत्याच झालेल्या ४४ हजार कोटींच्या मेगा डील मुळे अंबानींना त्यांचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा पुन्हा मिळाला आहे. या डीलमुळे रिलायंसच्या शेअरने उसळी घेतली असून त्यामुळे मुकेश यांची संपत्ती ४ अब्ज डॉलर्सनी वाढून ४९ अब्ज डॉलर्स वर गेली आहे.

फेसबुकने जिओ मध्ये १० टक्के हिस्सेदारी खरेदी केली असून भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी एफडीआय ठरली आहे. फेसबुकचाही २०१४ नंतर हा सर्वात मोठा करार आहे.२०१४ मध्ये फेसबुकने व्हॉटस अपचे अधिग्रहण केले होते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार फेसबुकशी केलेल्या नव्या करारामुळे अंबानी यांची संपत्ती ४ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. अंबानी यांचेकडून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या खिताब जिंकून घेणाऱ्या चीनच्या अलीबाबाचे जॅक मा यांच्या संपत्तीपेक्षा अंबानी यांची संपत्ती आता ३ अब्ज डॉलर्सने अधिक आहे.

फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग मात्र जागतिक श्रीमंत यादीत अंबानी यांच्या बराच पुढे आहे. या यादीत त्याचा ६ वा नंबर असून त्याची संपत्ती आहे ६३.३ अब्ज डॉलर्स. मुकेश अंबानी या यादीत १९ व्या क्रमांकावर आहेत.

Leave a Comment