अक्षयतृतीया आली पण सराफ बाजारावर मरगळच


फोटो साभार कॅच न्यूज
साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा अक्षयतृतीयेचा सण २६ एप्रिल रोजी साजरा होत आहे मात्र देशातील सराफ बाजारात काहीही हालचाल नसून बाजारावरची मरगळ कायम असल्याचे चित्र आहे. एक तर करोना मुळे देशात लॉक डाऊन आहे. त्यामुळे दुकाने बंद आहेत. अक्षयतृतीया हा शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी ग्राहक सोने चांदी खरेदीला महत्व देतात. विवाहसुगीतील पहिली शुभ खरेदी अक्षयतृतीयेला करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो. पण यंदा करोना मुळे बहुतेक विवाह पुढे ढकलले गेले आहेत. त्यातच सोन्याच्या भावाने उच्चांक केल्याने सराफ बाजारात शांतता जाणवते आहे.

गेल्या अक्षयतृतीयेला देशात ३३ टन सोन्याची विक्री झाली होती असे इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनकडून सांगितले गेले होते. तेव्हा सोन्याचा दर ३१५०० रुपये प्रती १० ग्राम होता तो आता ४५५०० रुपयांवर गेला आहे. गेली दोन वर्षे आर्थिक विकास दर मंदी आणि सोने दरवाढ याचा मोठा प्रभाव सराफ बाजारावर पडला आहे. अनेक सराफांनी यंदा ऑनलाईन दागिने विक्री करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद ग्राहकांनी दिलेला नाही असेही दिसून आले आहे.

Leave a Comment