पालघर प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये एकही मुस्लिम नाही – राज्य सरकार

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाकडून करण्यात आलेल्या हत्येच्या आरोपींची नावे जाहीर केली आहेत. या सर्व आरोपींच्या नावांची यादी त्यांनी ट्विटरवर जारी केली आहे. याशिवाय अटक करण्यात आलेल्या 101 आरोपींमध्ये एकही मुस्लिम नसल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुकद्वारे संबोधन करताना देशमुख म्हणाले की, पालघर घटनेसंबंधी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकही मुस्लिम नाही. या घटनेचे धार्मिक राजकारण करणे दुर्दैवी आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याचा प्रयत्न काहीजण करत आहे. ही राजकारण करण्याची नाही तर सोबत येऊन कोरोना व्हायरसशी लढण्याची वेळ आहे.

अफवांवर अनिल देशमुख म्हणाले की, व्हिडओमध्ये जो आवाज ऐकू येत आहे तो ओए बस असून काहीजणांनी त्याला शोएब बस असा विपर्यास केला. ते म्हणाले की, सर्व राज्य महामारीशी लढत असून, काही जण या प्रकरणाला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

16 एप्रिल रोजी मुंबईवरून सुरतला निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची पालघर जिल्ह्यातील एका गावातील जमावाकडून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने या संदर्भात उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Comment