करोना वॉरीयर्सचा ‘टू मिनिट ब्रेक’ व्हायरल


फोटो साभार नवभारत टाईम्स
भारतात करोना संक्रमणामुळे लॉक डाऊन आहे आणि त्यामुळे नागरिक घरात बंद आहेत. मात्र लॉक डाऊनचे पालन योग्य रीतीने होते वा नाही याची पाहणी करणाऱ्या पोलिसांचे काम त्यामुळे प्रचंड वाढले आहे. चोवीस तास या कामी गुंतलेले पोलीस अश्या अवघड वेळी स्वतःला रीलॅक्स कसे करतात असा प्रश्न कुणालाही पडेल. त्याचे उत्तर एका व्हिडीओ मुळे मिळाले आहे. हा व्हिडीओ आसाममधील नागाव पोलीसचौकी कडून शेअर केला गेला आहे. २ मिनिट ब्रेक आणि पुन्हा रिफ्रेश हा व्हिडीओ फेसबुकवर तुफान लोकप्रिय झाला असल्याचे त्याला मिळालेले लाईक आणि कॉमेंटवरून स्पष्ट आहे.

या व्हीडीओच्या कॅप्शन मध्ये लिहिले गेले आहे, ‘ आता रात्रीचे साडेनऊ वाजले आहेत आणि कोविड फायटर्स अजून कामावरच आहेत.’ या व्हिडीओ मध्ये एक पोलीस ऑफिसर म्हणतोय, ठीक आहे मित्रानो, आता दोन मिनिटाचा ब्रेक. हे म्हणताच एक गाणे वाजते आणि स्टेशनवरील महिला तसेच पुरुष पोलीस अधिकारी जागेवरून उठून त्यांचा पारंपारिक बिहू डान्स करताना दिसत आहेत. दोन मिनिटांनंतर पुन्हा सर्व आपापल्या जागी जाऊन काम करत आहेत. त्यांचा स्ट्रेस घालविण्याचा हा मार्ग लोकांना एकदम पसंत पडला आहे.

विशेष म्हणजे या दोन मिनिटांच्या ब्रेक मध्येही पोलीस चेहऱ्यावर मास्क घालून आहेत आणि नृत्य करतानाही सोशल डीस्टन्सिंगचे त्यांचे भान सुटलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. या व्हिडीओला अगदी कमी वेळात ९४०० लाईक, ४ हजार शेअर आणि ३ लाख व्हुज मिळाले आहेत. आसाममध्ये नवीन पिके आली की एप्रिल मध्ये हा बिहूचा सण साजरा होतो पण ड्युटी मुळे पोलीस कुटुंबियांसमवेत तो यंदा साजरा करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे.

Leave a Comment