येथे १०४ वर्षांपूर्वी हत्तीला दिले होते फाशी


फोटो साभार भास्कर
गुन्हा केला की शिक्षा आलीच. त्यासाठी प्रत्येक देशाचे कायदे नियम वेगवेगळे आहेत. अनेक देशात गंभीर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुद्धा दिली जाते. पण या शिक्षा साधारण गुन्हेगार माणसाना दिल्या जातात. प्राण्यांना अश्या प्रकारच्या शिक्षा दिल्याचे ऐकिवात नसते. पण १०४ वर्षापूर्वी अमेरिकेच्या टेनेसी राज्यात एका हत्तीला फाशी दिले गेले होते.

ही तारीख होती १३ सप्टेंबर १९१६. सुमारे दोन हजार लोकांच्या देखत या हत्तीला फाशी दिली गेली. त्यामागचे कारण मात्र अजब होते. असे झाले होते या गावात चार्ली स्पार्क या माणसाची ‘चार्ली स्पार्क्स वर्ल्ड फेमस शो’ या नावाची सर्कस आली होती. त्यात अनेक प्राणी होते तसा हा आशियाई हत्ती होता आणि तो सर्कसचे मुख्य आकर्षणही होता. काही कारणाने या हत्तीचा माहूत काम सोडून गेला होता आणि त्याच्या जागी नवीन माहूत आला होता.

गावातून त्यावेळच्या प्रथेप्रमाणे सर्कस मधील प्राणी आणि कलाकार यांची फेरी सुरु होती त्यावेळी या हत्तीला रस्त्यात खाण्याची काही वस्तू दिसली. त्या बरोबर हत्ती तिकडे वळला. माहुताला तो काबूत आणता आला नाही तेव्हा त्याने हत्तीच्या गंडस्थळावर भाला टोचून त्याला काबूत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हत्ती बिथरला आणि त्याने माहुताला खाली ओढून चिरडून टाकले. या घटनेने रस्त्यातील जनता घाबरली आणि सैरावैरा पळू लागली. एकच गोंधळ उडाला.

गावातील लोकानी या हत्तीला ठार करा अन्यथा सर्कस गावात सुरु राहू देणार नाही असा सर्कस मालकाला दम भरला. दोन दिवस वर्तमानपत्रातून या संदर्भात मोठ्या बातम्या झळकल्या. अखेर सरकारने हत्तीला फाशी द्यावे असा निकाल दिला आणि मोठी क्रेन मागवून लोकांच्या देखत या हत्तीला फासावर चढविले गेले. प्राण्यांविषयी माणूस किती क्रूर होऊ शकतो याची ही घटना मोठे उदाहरण बनून राहिली आहे.

Leave a Comment