न्यूझीलंडची करोनाला मात, लॉकडाऊन उठविण्याची तयारी


फोटो साभार मेट्रो
जगभर उत्पात माजाविलेल्या करोनाला मात देण्याची कामगिरी न्यूझीलंडने यशस्वी करून दाखविली असून आता देशात लॉक डाऊन उठविण्याची तयारी सुरु असल्याचे समजते. विशेष म्हणजे अन्य देशांप्रमाणे तेथेही करोना संक्रमण झाले होते मात्र पंतप्रधान जेसिंदा ओर्डेन यांनी वेळीच घेतलेले कठोर निर्णय आणि देशभरात लागू केलेल्या नियमांचे काटेखोरपणे केले गेलेले पालन यामुळे हे संक्रमण वाढले नाही असे आता स्पष्ट झाले आहे.

ऑकलंड विश्वविद्यापीठाच्या लस तज्ञ हेलेन पेट्रसीस या म्हणाल्या, करोनाला हरवायचे असेल तर त्याचे संक्रमण रोखणे फार आवश्यक असून हे केले गेले तर करोना आपोआप संपतो. ५० लाख लोकसंख्या असलेल्या न्युझीलंड मध्ये सोशल डीस्टन्सिंगचे पालन करणे तुलनेने सोपे होते आणि नागरिकांनी त्याला पूर्ण साथ दिली. न्यूझीलंडचे क्षेत्रफळ ब्रिटन इतके आहे. पंतप्रधान जेसिंदा यांनी या संदर्भातले निर्णय त्वरित घेतले आणि मार्च अखेरी १०० केसेस दिसल्याबरोबर लॉक डाऊन लागू केले आणि त्याची कडक अंमलबजावणी झाल्याने करोनावर काबू मिळविता आला. त्याचे संक्रमण रोखले गेले आणि प्रकोप वाढला नाही.

एप्रिलच्या सुरवातीला रोज ९० केसेस येत होत्या त्याचे प्रमाण मंगळवारी ५ वर आले असून देशात करोनाने १३ बळी घेतले आहेत. मृत्यू पावलेल्यांची पूर्ण माहिती जेसिंदा याना दिली गेली आहे. २० मार्च पासूनच देशात परदेशी नागरिकांना प्रवेश बंदी केली गेली आणि जे नागरिक परदेशातून परतले त्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले गेले. संक्रमण कमी झाल्यावरही लॉक डाऊन हटविण्याची घाई केली गेली नाही मात्र आता लॉक डाऊन हटविण्याबाबत चर्चा सुरु असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे असे समजते.

Leave a Comment