कपिल देवचा ‘टकलू लुक’ ट्रेंडमध्ये


फोटो साभार एनडीटीव्ही
करोना पायी लागलेल्या लॉकडाऊन मुळे सेलेब्रिटी असोत व सामान्य घरात बंद आहेत. त्यामुळे घरबसल्या काही तरी नवीन करून बघण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यातील सेलेब्रिटी जे काही वेगळे करतील त्याला लगेच प्रसिद्धी मिळणे स्वाभाविकच. आपले क्रिकेटर्ससुद्धा नव्या फॅड मध्ये मागे नाहीत. मात्र सोमवारी टीम इंडियाचे माजी कप्तान कपिल देव यांनी शेअर केलेला त्यांच्या नव्या लुकचा फोटो सर्वाना आश्चर्याचा धक्का देऊन गेला आहेच पण त्यांचा हा लुक एकदम ट्रेंडमध्येही आला आहे.

कपिल देव यांनी त्यांच्या मस्तकाची शोभा वाढविणारे कुरळे केस एकदम सफाचट करून चक्क टक्कल केले आहे. शिवाय ट्रेंडी दाढी वाढविली आहे. प्रथम दर्शनात कपिलला या लुक मध्ये ओळखणे अवघड असले तरी त्याचा हा लुक त्याच्या चाहत्यांना एकदम पसंत पडला आहे. काहींनी त्यांना बाहुबलीतील कटाप्पाची उपमा दिली आहे.

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी कपिल देवला टॅग करून केलेली कॉमेंट विशेष लोकप्रिय ठरली आहे. अनुपम म्हणतात, दोस्ता, टकलुंच्या दुनियेत स्वागत. फॅशन म्हणून टक्कल केले तर त्याला शेव्ह्ड म्हणतात. पण मी नेहमीच म्हणतो, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक टकलू आणि दुसरी भविष्यातील टकलू. या क्लब मध्ये तुझे स्वागत.

मास्टरब्लास्टर सचिननेही त्याचा स्वतःच केस कापत असल्याचा व्हिडीओ नुकताच शेअर केला होता तसेच टीम इंडिया कप्तान विराटचे केस पत्नी अनुष्का कापत असल्याचा व्हिडीओही नुकताच शेअर केला गेला आहे.

Leave a Comment