चीन दाखवू पाहतोय ताकद, सर्वात मोठ्या स्टेडियमचे काम सुरु


फोटो साभार दै. भास्कर
चीनच्या वुहान मधून पसरलेल्या कोविड १९ मुळे बिघडलेली परिस्थिती चीन मध्ये पूर्वपदावर आल्याचे आणि कोविड १९ वर नियंत्रण मिळविल्याचे जगाला दाखविण्यासाठी आणि आपल्या ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी चीन रिअल इस्टेट ग्रुप एव्हरग्रांड पुढे आला आहे. या ग्रुपने जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमचे बांधकाम सुरु केले असून त्यासाठी १.३ अब्ज डॉलर्स म्हणजे १३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हे स्टेडियम १ लाख प्रेक्षक क्षमता असलेले आहे.

सध्या बार्सिलोना येथील कॅम्पनाऊ हे जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम असून त्याची प्रेक्षक क्षमता ९९३५४ आहे. चीनच्या ग्वांग्झू मध्ये हे नवे स्टेडियम उभारले जात असून २०२२ पर्यंत त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. चीनचा फुटबॉल क्लब ग्वांझूचे हे होम ग्राउंड असेल. आठ वेळा चायनीज सुपरलीग आणि २ वेळा एशियन कप जिंकणारा हा चीनचा एकमेव क्लब आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊस आणि दुबईच्या बुर्ज खलीफाशी आमची स्पर्धा आहे असे कंपनीच्या मालकाचे म्हणणे आहे. २०२३च्या एशियन कपचे ओपनिंग येथेच व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ग्वांग्झू ही फुलनगरी म्हणजे फ्लॉवरसिटी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हे स्टेडियम कमळाच्या आकाराचे बांधले जात आहे. ३ लाख चौ.मीटर बांधकामात १६ व्हीव्हीआयपी रुम्स, १५२ खासगी रुम्स, फिफा सदस्य आणि खेळाडूंसाठी वेगळा परिसर असेल. एव्हरग्रांड कंपनी अशी आणखी तीन किंवा पाच स्टेडियम बनविणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यांची प्रेक्षक क्षमता ८० हजार ते १ लाख इतकी असेल. या वर्षी चीन मध्ये फिफा वर्ल्ड कप होणार होता पण करोनामुळे तो एक वर्षे पुढे ढकलला गेला आहे.

Leave a Comment