केदार, बद्रीनाथाची मंदिरे उघडण्याचा तारख्या प्रथमच बदलणार


फोटो साभार दै. भास्कर
हिमालयातील उत्तराखंड राज्यातील हिंदूसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या चारधाम म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यात्रा अक्षयतृतीयेपासून सुरु होतात. मात्र यंदा या यात्रांच्या इतिहासात प्रथमच हिवाळ्यात बंद असलेली ही मंदिरे उघडण्याच्या तारखा बदलल्या जात असून देशातील कोरोनची साथ आणि त्यामुळे असलेला लॉक डाऊन त्यासाठी कारण ठरला आहे.

उत्तराखंडचे सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी सोमवारी ही घोषणा केली. यापूर्वी २९ एप्रिल रोजी केदारनाथाचे तर ३० एप्रिल रोजी बद्री मंदिर उघडले जाणार होते. गंगोत्री आणि यमुनोत्रीची मंदिरे अक्षयतृतीयेला उघडली जातात. ती तारीख सुद्धा पुढे ढकलली जाईल असे समजते. केदारनाथचे रावळ यावेळी महाराष्ट्रातून जातात तर बद्रीचे रावळ केरळ मधून जातात. केदारनाथाचे रावळ रविवारी पहाटे उखीमठ येथे पोहोचले आहेत आणि बद्रीनाथाचे रावळ सुद्धा लवकरच पोहोचत आहेत.

अडचण अशी आहे की देशात लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे दुसऱ्या भागातून आलेल्या व्यक्तींना किमान १४ दिवस क्वारंटाइन करणे बंधनकारक आहे. यामुळे दोन्ही रावळ उपस्थित आहेत पण त्यांना १४ दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याची तारीख पुढे ढकलणे प्राप्त बनले आहे. यापूर्वी दोन्ही रावळाशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मंदिर उघडण्याची प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता मात्र त्याला मान्यता मिळाली नाही.

जून २०१३ मध्ये अशीच अडचण आली होती मात्र तेव्हा मंदिरे अगोदरच उघडली गेली होती पण नंतर केदारनाथ येथे झालेल्या प्रचंड बर्फवृष्टी आणि पुरामुळे मोठे संकट निर्माण झाले होते. त्यावेळी प्रथमच केदारनाथच्या पूजेत खंड पडला होता. त्यावेळी पूजेची मूर्ती उखीमठ येथे हलविली गेली होती आणि मंदीर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये पुन्हा मंदिरात नेऊन पूजा केली गेली होती.

Leave a Comment